– शरद पवार कुर्डुवाडीत गेले, बैठकाही घेतल्या अन् दौरा पूर्ण केला
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – राज्यातील ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांना चक्क एका अज्ञात व्यक्तीने धमकीचा फोन केला व कुर्डुवाडीच्या दौर्यावर येऊ नका, महागात पडेल, अशी धमकी या बहाद्दराने चक्क पवारांना दिली. परंतु, या धमकीला कोणतीही भीक न घालता शरद पवार हे कुर्डुवाडी दौर्यावर गेले. तेथे बैठका घेऊन त्यांनी आपला नियोजित दौरा पूर्ण केला.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आज सकाळी अज्ञात व्यक्तीचा हा धमकीचा फोन आला होता. हा व्यक्ती फोन करून कुर्डुवाडीच्या दौर्यावर येऊ नका, असे पवारांना धमकावत होता. मात्र, त्या धमकीच्या फोननंतरही शरद पवारांनी आपला दौरा कायम ठेवत सकाळी कुर्डुवाडी येथील दौरा पूर्ण केला आहे. फोन करणारी व्यक्ती कोण आहे आणि ही धमकी त्याने का दिली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पवारांना धमकी दिल्याच्या वृत्ताबाबत अद्याप पोलिसांकडून दुजोरा मिळू शकलेला नाही. परंतु, वृत्तवाहिन्यांनी हे वृत्त प्रसारित केल्यानंतर, पोलिसांनी तातडीने या घटनेची दखल घेत, चौकशी सुरु केली आहे.