– डॉक्टर्स, कर्मचार्यांचे सर्व सोयींनीयुक्त निवासी क्वार्टर रिकामे पडले
– ऐन पावसाळ्यात रुग्णांचे वैद्यकीय सेवेअभावी हाल!
– प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात गाजर गवत, डासांचा उच्छाद माजला
अंत्री कोळी, ता. चिखली (महेंद्र हिवाळे) – वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र केवळ शोभेची वास्तू बनली असून, या आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी कधीमधीच येथे येत असल्याने या आरोग्य केंद्राला जोडले गेलेल्या २० खेड्यांतील रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. राज्य सरकारचा गलेलठ्ठ पगार घेऊन हे डॉक्टर्स व कर्मचारी कामच करत नसल्याने ते जनतेसह शासनाचीदेखील फसवणूक करत असल्याचे धक्कादायक वास्तव दिसून आले आहे. त्यातही विशेष धक्कादायक बाब म्हणजे, या आरोग्य केंद्राचे सुसज्ज व सर्वसोयींनी युक्त निवासी क्वार्टर्स रिकामे पडलेले आहेत. तेथे कुणीही कर्मचारी राहत नाही. त्यामुळे प्रचंड पैसा खर्च करून बांधलेल्या या इमारती धूळ खात पडल्या असून, मुख्यालयी न राहणार्या व शासनाचा संबंधित भत्ता हडपणार्या कर्मचारी-डॉक्टर्स यांची चौकशी करण्याची मागणी ऐरणीवर आली आहे. तसेच, या वारंवार गैरहजर राहणार्या डॉक्टर्स व कर्मचार्यांवर कठोर कारवाईची गरज निर्माण झाली आहे.
सद्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या काळात विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. मलेरिया, टायफाईडसारख्या तापाच्या रुग्णांची संख्या वाढली असून, खासगी दवाखाने हाऊसफुल्ल झालेले आहेत. परंतु, गोरगरिब रुग्णांना खासगी दवाखान्यात जाण्यासाठी पैसा नाही. त्यामुळे त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्राशिवाय काहीही पर्याय नाही. परंतु, वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर्स व कर्मचारी राहात नसल्याने, या गोरगरिबांची मोठी हेळसांड होत आहे. वरवंड येथे डॉक्टर व कर्मचार्यांना राहण्यासाठी शासनाने क्वार्टर उपलब्ध करून दिलेले आहेत. या क्वार्टरमध्ये लाईट-पाण्याची सोयदेखील उपलब्ध आहे. परंतु, हे क्वार्टर खाली पडलेले असून, कोणताही डॉक्टर, कर्मचारी या क्वार्टरमध्ये राहात नाही. त्यामुळे जिजाऊ पत्रकार असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकाशभाऊ जेऊघाले यांनी जिल्हा परिषद व आरोग्य विभागाकडे लेखी स्वरुपात तक्रारदेखील दिलेली आहे. या तक्रारीवरून जिल्हा परिषद व आरोग्य विभाग या कर्मचार्यांवर कारवाई करेल का? व कर्मचारी वरवंड येथील क्वार्टरमध्ये राहण्यास येतील का?, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. या अर्जावर कोणत्याही प्रकारची कारवाई जर झाली नाही तर आंदोलनांचा इशारासुद्धा जिजाऊ पत्रकार असोसिएशनने दिलेला आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले असून, त्यामुळे मच्छर व डास मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहेत. मागच्या बाजूने गाजर गवत व वेली दवाखान्याच्या खिडक्यातून आतमध्ये घुसल्या आहेत. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तातडीने या आरोग्य केंद्राला कार्यान्वित करून गोरगरिबांना आरोग्य सेवेचा लाभ मिळून देण्याची गरज आहे.
डॉक्टरांना कामावर पाठवा, अन्यथा आरोग्य मंत्र्यांकडे जाऊ : ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’
वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला परिसरातील २२ खेडी जोडलेली आहेत. सद्या विविध व्हायरल तसेच साथीच्या रोगांचा उद्रेक झाला असून, गोरगरिबांना खासगी दवाखान्याचे उपचार परवडणारे नाहीत. तेव्हा जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तातडीने या प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व डॉक्टर्स व कर्मचार्यांना तातडीने कामावर हजर होण्याचे आदेश द्यावेत. तसेच, ज्यांना नियमाप्रमाणे क्वार्टर्स वाटप करण्यात आले आहेत, त्यांना क्वार्टरमध्ये राहण्यास सांगावे. अन्यथा, त्यांचा संबंधित भत्ता बंद करण्यात यावा. तसेच, कामावर हजर नसतानाही ज्या डॉक्टर्स व कर्मचारी यांनी हजेरीपटावर सह्या केल्या असतील, त्यांचे ग्रामस्थांसमक्ष पंचनामे करून ते खरेच गैरहजर असतील तर त्यांची सुटी गृहीत धरावी, अथवा वेतन कपात करावी. अन्यथा, याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्यावतीने आरोग्य मंत्र्यांकडे लेखी स्वरुपात तक्रार दाखल केली जाईल, शिस्तभंगासह कठोर कारवाईच्या मागणीसाठी पाठपुरावा केला जाईल, असा इशारा ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या संपादकीय मंडळाने दिला आहे.