शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच!; तयारीला लागण्याचे उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश
– ठाकरेंची तोफ धडाडणार म्हणजे धडाडणार!
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – दसरा मेळाव्यावरून शिंदे गटाला पुढे करत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न होत असला तरी, कोणत्याही परिस्थितीत परंपरेप्रमाणे दसरा मेळावा हा दादरच्या शिवतीर्थावरच होणार असल्याचा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त करत, तयारीला लागण्याचे निर्देश आपल्या कट्टर शिवसैनिक व पदाधिकार्यांना दिले आहेत. त्यामुळे येणार्या काळात दसरा मेळाव्यावरून निर्णायक संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे विभागप्रमुख आणि उपविभागप्रमुख यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत दसरा मेळाव्या संदर्भात नेत्यांना महत्वाच्या सूचना व आदेश दिलेत. महिला आघाडी, युवा सेना, शिवसैनिकांनाही सोबत घेण्याचे आदेश देत, कुठल्याही परिस्थितीत परंपरेप्रमाणे दसरा मेळावा होणार आणि तो शिवतीर्थावरच होणार असा निर्धार यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
शिवतीर्थावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमवण्याचे आदेशही उद्धव ठाकरे यांनी विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि सर्व पदाधिकाऱ्यांना दिले. उद्धव ठाकरे यांनी बैठकीत शिवसेनेतून फुटलेल्या नेत्यांवरही निशाणा साधला. शिवसेना फोडण्याआधी इतिहास जाणून घ्यावा. फुटलेले सर्व नेते तोतया आहेत. जनता त्यांना त्यांचा मार्ग दाखवेल. असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांमध्ये जोश भरला. दसरा मेळाव्यासाठी सर्व आघाड्यांना सोबत घेऊन कामाला लागा. विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुखसोबत असल्याने आत्मविश्वास दुणावल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
कार्यकर्त्यांमध्ये वेगळा उत्साह आहे. मागील दोन महिन्यांपासून राज्यात ज्या घडामोडी सुरू आहेत, त्यामुळे राज्यातील आणि मुंबईतील शिवसैनिक चिडून उठलेला आहे. शिवसैनिकांच्या अंगात वेगळे तेज आलेले आहे. मात्र यावेळी उद्धव ठाकरे यांनी आजच्या बैठकीत अत्यंत संयमाची भूमिका घेतली. आपण जे काम यापूर्वी करत आलो आहोत, तेच काम करायचे आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे, अशी माहिती शिवसेनेच्या कार्यकर्त्याने दिली. तसे वृत्त ‘टीव्ही ९ मराठी’ दिले आहे. आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी काय मार्गदर्शन केले, याचीदेखील माहिती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिली. आज उद्धव ठाकरे यांनी उपविभागप्रमुख आणि विभाग प्रमुखांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत महत्त्वाच्या दोन विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये २१ तारखेला गटप्रमुख आणि उपशाखाप्रमुख यांचा मेळावा हाेणार आहे. शिवाजी पार्कवर दरवर्षी होणार्या दसरा मेळाव्यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. हे दोन्ही मेळावे चांगले व्हावेत यासाठी कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहिजे. त्याच अनुषंगाने कार्यकर्त्यांनी कामाला सुरुवात करावी, असे या बैठकीत सांगण्यात आले, अशी माहिती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिली.