Breaking newsHead linesMarathwada

संतप्त विद्यार्थ्यांचा फडणवीसांना घेराव, पोलिसांचा लाठीमार!

– ‘५० खोके, एकदम ओके’, ‘पोलिस भरती झालीच पाहिजे’च्या दिल्या घोषणा

नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) – वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने राज्यातील लाखो तरुणांची रोजगाराची संधी हिरावली गेली. दुसरीकडे, राज्यातील विविध विभागातील नोकर भरती रखडल्याने तरुणांमध्ये प्रचंड संताप आहे. या संतापाचा सामना आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडात केला. ‘५० खोके, एकदम ओके’, ‘पोलिस भरती झालीच पाहीजे’, अशा घोषणा देत, संतप्त तरुणांनी त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी वेळीच धाव घेत, फडणवीस यांना गर्दीतून सुखरूप बाहेर काढले. तसेच, घोषणाबाजी करणार्‍या तरुणांवर लाठीमार केला. संतप्त जमाव व तरुणांनी फडणवीस यांच्यासह पोलिसांचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त फडणवीस आज नांदेडमध्ये होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवनपट उलगडून दाखवणार्‍या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमानंतर फडणवीस सभागृहाबाहेर येत असतानाच, तरुणांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना घेराव घालण्याचा प्रयत्न करत, जोरदार घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे घटनास्थळी चांगलाच गोंधळ निर्माण झाला. सुरुवातीला काय होते ते पोलिसांना कळलेच नाही. मात्र जमाव आक्रमक झाल्याचे पाहून पोलिस धावून आले. ‘पोलीस भरती झालीच पाहिजे’, ‘५० खोके-एकदम ओके’, अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. यावेळी विद्यार्थ्यांना भेटून काहीही न बोलताच फडणवीस तेथून रवाना झाले. तर त्यानंतर पोलिसांनी या तरुण विद्यार्थ्यांवर बेदम लाठीमार सुरु केला. तसेच, काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी सुरु होती. ‘गेल्या काही वर्षांपासून पोलीस भरतीची प्रक्रिया केली जात नाही. परिणामी तरुणांसमोर रोजगाराचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ ही भरती करावी,’ अशी मागणी आंदोलनकर्त्या तरुणांनी केली आहे.

दरम्यान, नांदेडमधील कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी, विरोधकांना उत्तर देताना सांगितले, की आजच्या दिवशी आरोप करून दिवसाचे महत्त्व कमी करू नका. हा आजच्या दिवसाचा अपमान ठरेल. औरंगाबाद येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेहमीच्या वेळेआधी ध्वजारोहण करून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा अपमान केला, असा आरोप माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला होता. यावर फडणवीस यांनी ही प्रतिक्रीया दिली. हैदराबाद येथे मुक्ती संग्राम दिनाचाच कार्यक्रम आहे. तीन राज्याचे मुख्यमंत्री तिथे आहेत. मुख्यमंत्र्यांना लवकर ध्वजारोहण करण्याची काही हौस नाही, असे सांगत आजच्या दिवशी राजकारण करू नये, असे फडणवीस म्हणाले.
———————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!