Breaking newsHead linesKhandeshMaharashtra

माजी केंद्रीय मंत्री, नंदूरबारचे भाग्यविधाते माणिकराव गावित यांचे निधन

– उद्या, रविवारी शासकीय इतमामात नवापूर येथे अंत्यसंस्कार

नंदूरबार (आफताब खान) – तब्बल नऊ वेळा खासदारकी भूषवलेले तथा देशाचे माजी गृहराज्यमंत्री, तत्कालिन हंगामी लोकसभा अध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत व ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांचे आज (दि.१७) सकाळी आठ वाजेच्या सुमारास निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. नाशिकमधील सुयश हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. उद्या (१८ सप्टेंबर) नवापूर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ते कार्यकर्त्यांमध्ये ‘दादासाहेब’ म्हणून लोकप्रिय होते. माणिकराव गावित यांचे सुपुत्र भरत गावित यांनी ट्विटरवरुन वडिलांच्या निधनाची दुःखद बातमी दिली. गावित यांचे पुत्र तसेच मुलगी राजकारणात सक्रिय आहेत. मुलगी निर्मला गावित इगतपुरीच्या माजी आमदार तर पुत्र भरत गावित भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य आहेत.

माणिकरावांनी १९६५ मध्ये ग्रामपंचायतीपासून राजकारणाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर केंद्रीय गृह राज्यमंत्री, सामाजिक न्याय राज्यमंत्री अशी पदे न मागताच मिळाली. संसदेतील सर्वात ज्येष्ठ खासदार म्हणून त्यांनी लोकसभेचे हंगामी अध्यक्षपदही भूषवले होते. १९८१ मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभा लढवली व विजयीही झाले. त्यानंतर त्यांनी सलग नऊ वर्षे विजयी घोडदौड कायम ठेवली. १९९९ साली झालेल्या तेराव्या लोकसभेत त्यांना एक लाख ३० हजार ७७१ इतके प्रचंड मताधिक्य लाभले. देशातील प्रचंड मताधिक्य मिळविणार्‍या टॉप १० खासदारांमधील एक नाव म्हणून संबंध देशाला ते परिचित झाले होते. परंतु, काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नंदूरबारमध्ये २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत माणिकराव गावितांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांचे सुपुत्र भरत गावित यांनी आपल्यासाठी लोकसभेची उमेदवारी मागितली होती. मात्र काँग्रेसने के. सी. पाडवी यांना तिकीट दिले. त्यामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भरत गावित यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर कन्या निर्मला गावित यांनी शिवबंधन हाती बांधले. २०१४च्या निवडणुकीत माणिकराव गावित दहाव्यांदा विजयी झाले असते, तर लोकशाहीप्रधान देशात सलग दहा वेळा संसदेचे सदस्य म्हणून निवडून येण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावे जमा झाला असता, परंतु मोदी लाटेत त्यांना पराभवाचा धक्का बसला आणि वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा मान हुकला.
आपल्या संसदीय कारकिर्दीत १९९८-९९ या काळात लेबर अ‍ॅण्ड वेल्फेअर मंत्रालयाच्या समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. १९९९ ते २००१ या काळात अनु. जाती व अनु.जमाती कल्याण समितीचेही सदस्य होते. १९९०-९१ आणि १९९९-२००० या काळात लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांच्या अनुपस्थिती संदर्भातील समितीचे ही ते सदस्य होते. संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए)च्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांना २२ मे २००४ रोजी डॉ. मनमोहनसिंग यांच्या मंत्री मंडळात केंद्रीय गृह राज्यमंत्री म्हणून स्थान मिळवून दिले होते.


मोदी लाटेने वर्ड रेकॉर्ड हुकविला

नवापूर तालुक्यातील धुळीपाडा येथे २९ ऑक्टोबर १९३४ रोजी माणिकराव गावित यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण जुन्या काळातील मॅट्रीक पर्यंत झाले. १९६५ साली ते नवापूर ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आले. धुळे जिल्हा परिषदेत नवापूर गटातून ते सदस्य म्हणून निवडून आले. १९७१ ते १९७८ साली धुळे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती म्हणून ते निवडून आले, तर १९८० साली ते नवापूरचे आमदार झाले. ते सर्वप्रथम १९८१ साली खासदार झाले, त्यावेळी त्यांचे ४७ वय होते. तेव्हापासून ते २०१४ पर्यंत ते तब्बल ९ वेळा लोकसभेवर प्रचंड म्हणजे लाखाच्या मताधिक्याने निवडून गेले आहेत. २०१४ मध्ये मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला नसता तर त्यांनी विश्वविक्रम प्रस्थापित केला असता.


काँग्रेसची विचारधारा तळागाळात पोहोचवली

लहानपणापासूनच राजकारणाची आवड असलेल्या माणिकराव गावित यांनी अखेरपर्यंत गांधी घराण्याच्या काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहत, काँग्रेसची विचारधारा तळागाळात पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले. म्हणूनच ते नंदूरबारसारख्या आदिवासी भागात काँग्रेसच्या उमेदवारीवर सलग नऊवेळा खासदार म्हणून निवडून आले होते. खासदारकीची निवडणूक लढवण्यापूर्वी ते सलग तीनवेळा आमदार आणि त्याआधी ते सलग दोनवेळा नंदूरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले आहे. त्यांची प्रकृती ढासाळल्याने त्यांना उपचारासाठी नाशिक येथील सुयश खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आज शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. दुपारपर्यंत त्यांचे पार्थिव नाशिकहून नवापूर इथं आणण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या (रविवार) सकाळी ११ वाजता नंदूरबार जिल्ह्यातील त्यांचे मूळ गाव असलेल्या नवापूरमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
——————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!