दादागिरीला उत्तर दादागिरीनेच मिळेल; अंबादास दानवेंनी बंडखोरांना ठणकावले!
– देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोरोनाचे जंतू कोंबणार होते, आता बॅनरवर फडणवीसांचा फोटो कसा चालतो? : दानवे
– लोकप्रतिनिधी सोडून गेले म्हणून काय झाले, लोकं मात्र आपल्यासोबत आहेत, सर्व मतदारसंघात तयारी करा, शिवसैनिकांना निर्देश!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – बुलढाण्यात दादागिरीला दादागिरीनेच उत्तर देऊ, अशा शब्दांत शिवसेना नेते तथा राज्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचा नामोल्लेख टाळून त्यांना ठणकावले. एवढेच नव्हे तर बुलढाणा नगरपालिका माझी, माझ्याच पोराची असे स्वप्नही कुणी पाहू नका, असा टोलाही त्यांनी गायकवाड यांना हाणला. इथले आमदार नगरपालिकेत बसून अनधिकृत कामे करतात, बुलढाण्यात वरली-मटका खुलेआम चालतो, एसपी ऑफिसच्या बाजूला अवैध धंदे चालतात, इथले पोलिस झोपले आहेत का? असा सवाल करत पोलिसांनो, सत्ताधारी पक्षाच्या ताटाखालचे मांजर बनू नका, असा इशाराही दानवे यांनी दिला आहे.
बुलढाणा येथे शिवसेनेचा भव्य जिल्हा मेळावा आज शिवसैनिकांच्या सळसळत्या उत्साहात पार पडला. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना अंबादास दानवे बोलत होते. याप्रसंगी शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, वसंतराव भोजने यांच्यासह शिवसेना, युवा सेना व शिवसेना अंगीकृत सर्व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रामुख्याने हजर होते. याप्रसंगी दानवे यांनी शिवसेना बंडखोरांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, की आता जसे गद्दार आहेत, तसेच शिवरायांच्या स्वराज्यातही होते. मात्र, गद्दारांना आता कुणी आठवतही नाही, शिवरायांचे निष्ठावंत मावळेच लोकांच्या स्मरणात आहेत. योग्यवेळी ५० खोक्यांचे पुरावे समोर येतील, ज्यांनी दिले त्यांचेच लक्ष या खोक्यांवर आहे, तेच सांगतील. गद्दार आमदारांच्या गद्दारीचा टिळा पुसल्या जाणार नाही, असेही दानवे यांनी सांगितले. बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच्या सर्व सातही विधानसभा मतदारसंघाची तयारी करा, लोकसभेची तयारी करा, असे निर्देशही त्यांनी शिवसैनिकांना दिले. जे गद्दार उद्धव ठाकरे यांना सोडून भाजपात गेले, त्यांचे हाल भाजपच करेल. त्यामुळेच भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी बुलढाण्यात येऊन बुलढाण्याचा पुढचा खासदार भाजपचा असेल, असे जाहीर केले आहे. याचाच अर्थ प्रतापरावांनी आता घरी बसावे किंवा भाजपात जावे, असा होतो, असा टोलाही दानवे यांनी हाणला.
याप्रसंगी दानवे यांनी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर नामाेल्लेख टाळून घणाघाती टीका केली. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात इथले आमदार कोरोनाचे जंतू कोंबणार होते. आता तुमच्या बॅनरवर फडणवीस कसे चालतात? सत्ता काय येते आणि जाते, सत्तेची खूर्ची कायमची घेऊन कुणी आले नाही. बुलढाणा जिल्ह्यात लोकप्रतिनिधी राहिले नाही म्हणून काय झाले, त्यांना निवडून देणारे लोकं मात्र आपल्यासोबत, शिवसेनेसोबत, ठाकरेंसोबत आहेत, असे नीक्षून सांगत, शिवसैनिकांनो, तुम्हाला ‘गिनके आणि चुनके’ मारणारा अजून जन्माला यायचा आहे, दादागिरीला आता दादागिरीनेच उत्तर द्या, असेही दानवे यांनी ठणकावले.
दरम्यान, शिवसेनेच्या मागील कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला होता. आता तसला काही प्रकार झाला तर जिल्हा पेटून उठेल, म्हणून जिल्हा पोलिसांनी शहरात व कार्यक्रमस्थळी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता. वरिष्ठ पोलिस अधिकारी, दंगल नियंत्रक पथके तैनात करण्यात आले होते. कार्यक्रमस्थळी पोलिसांनी तपासणीशिवाय कुणालाही आत सोडले नाही.