गडचिरोली (जिल्हा प्रतिनिधी) – मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात भारतीय चित्त्याचे आगमन होत आहे. या संदर्भात प्राणहिता वनप्रकल्प विभाग आलापलीद्वारे दुर्गम भागातील झिमेला गावात जाऊन जनजागृती करण्यात आली.
सत्तर वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या चित्त्याचे लवकरच मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यान येथे पुनरागमन होणार आहे. त्या निमित्ताने आज (दि.१३)झिमेला गावात एफडीसीएम, प्राणहिता वन प्रकल्प विभाग आलापलीद्वारे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यांतील झिमेला या अतिदुर्गम गावात जाऊन विद्यार्थी व गावकर्यांशी संवाद साधून भारतातील चित्त्याच्या आगमनाबाबतची माहिती देण्यात आली. याप्रसंगी प्राणहिता वन प्रकल्प विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक चंद्रकांत राजपूत तसेच अमोल नागे यांनी पीपीटीद्वारे भारतीय चित्त्याबाबत माहिती दिली.
शाळेत प्रोजेक्टरच्या माध्यमातून रंगीबेरंगी चित्रांचा सहाय्याने चित्त्याची ओळख करून देण्यात आली. चित्ता व बिबट यांच्यातील फरक कसा ओळखावा, चित्त्याची वैशिष्ट्ये, या प्राण्याची भारतीय वनांसाठी आवश्यकता व इतर विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक श्री.राठोड, विनोद तोरेम, महादेव सडमेक, सुरेश सडमेक, व इतर झिमेला गावातील नागरिक उपस्थित होते. या जनजागृती अभियानाचे आयोजन वन प्रकल्प विभागाचे वनपाल पी. के. मडावी, वनरक्षक गणेश राठोड, अमोल चव्हाण, नरेंद्र गेडाम यांनी केले होते.
——————