सातारा (जिल्हा प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ वे वंशज छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. पुण्यातील जहांगीर रूग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज सायंकाळी ५.४५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव रात्री उशिरा अदालत वाडा येथे आणले जाणार आहे, उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
साताराच्या गादीचे श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले हे छत्रपती उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांचे चुलते आहेत. पुणे येथील जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर गेले काही दिवस उपचार सुरु होते. परंतु, त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. छत्रपती शिवाजीराजे यांची शांत आणि संयमी व्यक्तिमत्व अशी ओळख होती. त्यांनी सलग सहा वर्षे नगराध्यक्ष म्हणून आपली कारकीर्द गाजवली. दरम्यान, राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे ते काका असल्याने, ज्यावेळी उदयनराजे आणि शिंवेद्रराजे यांच्यातील वाद टोकाला गेला, त्या प्रत्येकवेळी त्यांनी वडिलकीच्या नात्याने दोघांचे मनोमिलन घडविले होते. हे दोघेही आक्रमक नेते आपल्या वडिलासमान काकांचा शब्द खाली पडू देत नव्हते. त्यामुळे छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या निधनाने राजघराण्यावर आणि सातार्यामध्ये शोककळा पसरली आहे.
अदालत वाडा आणि शिवाजीराजे भोसले यांच्याविषयी सातारकरांमध्ये नेहमी आदराची भावना राहिली आहे. शिवाजीराजे भोसले हे गेली ७५ वर्ष साताऱ्यातील आदालत वाडा येथे राहत होते. अदालत वाडा हा न्यायनिवाडा करणारा वाडा म्हणून सुपरिचित होता व आजदेखील आहे. आजही या वाड्यातून दिलेला शब्द अथवा आदेश हा सातारकर सन्मानपूर्वक मानतात. साताऱ्याच्या राजघराण्यातील पुण्यशील सुमित्राराजे भोसले आणि शाहू महाराज यांना प्रतापसिंह, अभयसिंह, विजयसिंह आणि शिवाजीराजे अशी चार मुले, शिवाजीराजे भोसले हे सर्वात लहान होते. त्यांचा जन्म 23 एप्रिल 1947 साली झाला होता. शिवाजीराजे भोसले यांनी सातारा शहराचे नगराध्यक्ष म्हणून 15 मे 1985 ते 16 डिसेंबर 1991 पर्यंत काम केले, याकाळात त्यांनी सातारा शहराच्या विकासासाठी विविध विकासकामं केली. शिवाजीराजे भोसले यांच्या कन्या वृषालीराजे यांनी साताऱ्यातील सामाजिक कामातील सहभाग वाढवला होता. वृषालीराजे सातारच्या राजकारणात सक्रिय होणार असल्याचे संकेत देखील मिळाले होते.