गद्दार आमदारांनी स्वतःच्या बापाच्या जागी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव लावावे – शिवसेना नेते तथा आमदार भास्कर जाधव
हिंगोली (ब्रेकिंग महाराष्ट्र) : शिवसेनेतील बंडाळीनंतर पक्षात उभी फूट पडली आणि त्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पडले. पुढे जाऊन ही लढाई पक्षाच्या वर्चस्वापर्यंत पोहोचली. पक्षातील गटनेतेपद, पक्षप्रमुख आणि त्यानंतर थेट पक्षचिन्ह. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे. अशातच राज्यात मात्र प्रत्येक जिल्ह्यात आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी शिंदे आणि ठाकरे गटांत चढाओढ सुरु असल्याचे पाहायला मिळतं. अशातच 12 सप्टेंबर रोजी हिंगोलीमध्ये शिवसेनेच्या वतीने महामेळावा आयोजित केला होता. महामेळाव्यापूर्वी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीनं हिंगोली शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. या मेळाव्याला भास्कर जाधव आणि बबन थोरात उपस्थित होते. यावेळी शिवसैनिकांना संबोधित करताना गद्दार आमदारांनी स्वतःच्या बापाच्या जागी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव लावावे असे, आव्हान शिवसेना नेते आ.भास्कर जाधव यांनी शिंदे गटातील आमदारांना दिले आहे.
शिवसेनेची गद्दारी करून शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करणाऱ्या गद्दारांनी स्वतःच्या बापाच्या जागेवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे नाव वापरावे, असे आव्हान शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केलं आहे. हिंगोली शहरांमध्ये शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना भास्कर जाधव बोलत होते. बंडखोर आमदार बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेत आहेत. त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबत विचारणा केली असता भाजपची काही चाणक्य मंडळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमचे नेते आहेत, ते राष्ट्रीय नेते आहेत, असं वारंवार सांगत आहेत. तुम्ही एवढेच प्रमाणिक आहात, तर बापाच्या जागेवर बाळासाहेब ठाकरे यांचे नाव लावा. आम्हाला वाईट वाटणार नाही, आम्हालाही तुमची निष्ठा बघायची आहे. केवळ पाप लपवण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर केला जातो, असा घनाघातही भास्कर जाधव यांनी शिंदे गटातील आमदारांवर केला आहे.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये शिवसेनेच्या महामेळाव्या दरम्यान, शिवसेनेच्या दोन्ही जिल्हाप्रमुखांनी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर सडकून टीका केली. हिंगोलीचा सलमान खान शर्ट काढून दंड दाखवतो, असे म्हणत जिल्हाप्रमुख विनायक भिसे यांनी संतोष बांगर यांच्यावर सडकून टीका केली आहे. “कावड यात्रेमध्ये शर्ट काढून दंड दाखवायचे, गणपतीमध्ये कपडे काढून दंड दाखवायला लागले. इकडून केस, तिकडून केस, अरे काय ते आमदार संविधानिक पद आहे. राव त्याची काहीतरी किंमत तर असायला पाहिजे ना. व्यायाम शाळा सुद्धा सोडल्या नाही. यांनी ज्या व्यायाम शाळेमध्ये आपण शरीर साधना करतो, आपलं शरीर बळकट करतो, त्या व्यायाम शाळेमध्ये हे मटका पत्ते खेळत आहेत.” असाही आरोप करण्यात आला. या मेळाव्याला असंख्य शिवसैनिकांची उपस्थिती होती.