नंदूरबार (जिल्हा प्रतिनिधी) – शहरातील शहर पोलीस स्टेशन, शहर वाहतूक शाखा, तालुका पोलीस स्टेशन आणि उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी श्री गणरायाची स्थापना करण्यात आली होती. मात्र गणेश विसर्जनाच्या दिवशी नंदुरबार शहरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त असल्याने, आणि गणेश विसर्जन दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजेपर्यंत चालल्याने, बंदाेबस्तावर असलेल्या पाेलिसांना आपल्या पोलीस स्टेशनमधील गणरायाचे विसर्जन करता आले नव्हते. त्यामुळे आज सकाळी मोठ्या पारंपारिक पद्धतीने गणरायाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. व उत्साहात बाप्पांना निराेप देण्यात आला.
या मिरवणुकीत लेझीम पथक तसेच ढोल ताशांच्या आणि पारंपारिक वाद्यावर पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. स्वतः पोलीस अधीक्षक पी आर पाटील या गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन त्यांनीही नृत्य करत पोलीस कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवला. एकूणच शहरातून निघालेली पोलिसांची गणेश विसर्जन मिरवणूक सर्वसामान्यांची आकर्षणाची ठरली. विशेष म्हणजे या विसर्जन मिरवणुकीत महिला पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. पोलीस दलाच्यावतीने यावेळी गुलाल न उधळता फुलांच्या पाकळ्या उधळत पर्यावरणाचे समतोल राखत विसर्जन मिरवणूक काढली. एकूणच बंदोबस्ताच्या ताणतणावातून मुक्त झालेल्या पोलिसांनी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या आणि जिल्ह्यातील पोलीस दलावरील विघ्न सोबत घेऊन जा. अशी प्रार्थना करत आपल्या लाडक्या गणेशाला निरोप दिला.