– जयंत पाटील अन् अजित पवारांच्या कार्यकर्त्यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन!!
नवी दिल्ली (विशेष राजकीय प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या ८ व्या राष्ट्रीय अधिवेशनादरम्यान नवी दिल्लीत आज जोरदार हाय व्होल्टेज ड्रामा घडला आणि तोही चक्क पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या समोर. पक्षाचे नेते तथा राज्यातील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाषणावरून मानापान नाट्य रंगले आणि अजितदादा पुन्हा एकदा रूसले, त्यानंतर ते भाषण न करताच व्यासपीठावरून उठले. सुप्रिया सुळे व इतर नेत्यांनी त्यांची मनधारणी करून पुन्हा व्यासपीठावर बसवले खरे, पण दादा काही बोलले नाहीत. अजितदादांच्या या रूसव्याचीच आज राजधानी नवी दिल्लीत चर्चा सुरु होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन आज दिल्लीतील तालकटाेरा स्टेडियम येथे पार पडले. या अधिवेशनात सर्वच बड्या नेत्यांनी भाषणे केलीत. मात्र, अजित पवार यांनी भाषण केले नाही. तसेच, यानिमित्ताने अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील शीतयुद्ध पुन्हा एकदा दिसून आले. ‘अजित दादांना बोलू द्या…’ अशी घोषणाबाजीदेखील पहायला मिळाली. दुसरीकडे, जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजी केली. वातावरणात तणाव निर्माण झाला. हा तणाव निवळण्यासाठी प्रफुल्ल पटेलांनी हातात माईक घेतला आणि एक स्टेशन गेल्यावर दुसरे स्टेशन येईल, असे सांगून सर्व कार्यकर्त्याना शांत राहण्याचे आवाहन केले. जेंव्हा जयंत पाटलांचे भाषण सुरू झाले तेंव्हा अजित पवार व्यासपीठावरून उठले आणि थेट बाहेर पडले. त्यांच्या या तडकाफडकी स्वभावामुळे ते पुन्हा पक्षावर नाराज आहेत का? अशी चर्चा सुरु झाली होती. अजित पवार सभागृहात नसल्याने त्यांना घेऊन जाण्यासाठी सुप्रिया सुळे या बाहेर गेल्या. त्या अजित पवार यांना सभागृहात परत घेऊन आल्या. मात्र तोपर्यंत शरद पवार यांचे समारोपाच्या भाषणाला सुरुवात झाली होती. यामुळे त्यांना या कार्यक्रमात भाषणच करता आले नाही. हा सगळा गोंधळ शरद पवारांच्या समोरच घडला.
या सर्व घडामोडींची सारवासारव करताना प्रफुल पटेल म्हणाले की, अजित पवार हे वॉशरूमला गेले आहेत. ते थोड्याच वेळात येतील. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नव्या झेंड्याचे अनावरण करण्यात आले. तोपर्यंत अजित पवार व्यासपीठावर येतील अशी अपेक्षा होती. पण तरीही अजित पवार पोहोचले नाहीत. त्यामुळे शेवटी शरद पवार यांचा समारंभाचे भाषण सुरू झाले आणि या संपूर्ण अधिवेशनात अजित पवारांचे भाषण झालेच नाही. मागे पंतप्रधानांच्या देहूतल्या कार्यक्रमात अजित पवारांना बोलू दिले गेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीकडून महाराष्ट्राचा अपमान झाल्याची टीका सुरू करण्यात आली होती. आज दिल्लीतल्या राष्ट्रीय अधिवेशनात पक्षाच्या व्यासपीठावर त्यांना स्थान मिळाले नाही. याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. पक्षाचा राष्ट्रीय कार्यक्रम असल्यामुळे खासदार आणि राष्ट्रीय पदाधिकार्यांना प्रामुख्याने स्थान होते, असे आयोजकांनी खासगीत बोलताना सांगितले आहे.
—————-