– धोत्रे – देशमुख – भुईभार – पोहरे यांची रणनीती यशस्वी
– लोककवी डॉ. विठ्ठल वाघ उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पडले!
अमरावती (जिल्हा प्रतिनिधी) – रयत शिक्षण संस्थेनंतर राज्यात सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या श्री शिवाजी संस्थेची सुरुवातीला अटीतटीची ठरणारी निवडणूक अखेर एकतर्फी झाली. या संस्थेवरील सोयर्या-धायर्यांचे वर्चस्व कायम राहिले असून, धोत्रे-देशमुख-भुईभार-पोहरे या सोयरेमंडळींनी आखलेली रणनीती यशस्वी ठरत, संस्थेच्या अध्यक्षपदी प्रगती पॅनलचे हर्षवर्धन देशमुख हे विजयी झाले आहेत. देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून, माजी मंत्री आहेत. त्यांची या पदावर फेरनिवड झाली आहे. त्यांनी काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचा १२७ मतांनी पराभव केला आहे. देशमुख यांना ३८९ मते मिळाली. विशेष धक्कादायक बाब म्हणजे, ज्येष्ठ साहित्यिक तथा महाराष्ट्राचे लोककवी डॉ. विठ्ठल वाघ यांचा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला आहे.
शिवाजी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत यंदा मोठी चुरस निर्माण झाली होती. प्रगती आणि विकास असे दोन पॅनल या निवडणुकीत उतरले होते. तर हे दोन्ही पॅनल भ्रष्ट आहेत, असा आरोप करत लोककवी विठ्ठल वाघ हे मैदानात उतरले होते. परंतु, सोयरे-धायरे मंडळीच्या रणनीतीने त्यांना पराभवाचे तोंड दाखवले. या संस्थेचे ७७४ आजीव सदस्य या निवडणुकीसाठी मतदार होते. काल झालेल्या निवडणुकीत ८६.८० टक्के मतदान झाले. मतदानानंतर लगेच अमरावती येथील शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयात मतमोजणी झाली. यात सध्याचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुखांच्या ‘प्रगती पॅनल’ने ९ पैकी ८ जागा जिंकत बाजी मारली आहे. विरोधी ‘विकास पॅनल’ला उपाध्यक्षपदाच्या एकाच जागेवर समाधान मानावे लागले. माजी राज्यमंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी ३८९ मते घेत, काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचा १२७ मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे, लोककवी डॉ. विठ्ठल वाघ यांच्यासोबतच विधानसभेचे माजी उपाध्यक्ष शरद तसरे हेसुद्धा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. उपाध्यक्षपदाच्या तीनपैकी दोन जागांवर प्रगती पॅनल तर एका जागेवर विकास पॅनलने विजय मिळवला आहे. उपाध्यक्षपदी ‘प्रगती’चे गजानन पुंडकर, केशवराव मेतकर आणि ‘विकास’चे जयवंत उर्फ भैय्यासाहेब पाटील पुसदेकर विजयी झाले आहेत. तर अरबट, डॉ. शेळकेंसह जेष्ठ साहित्यिक विठ्ठल वाघ आणि माजी विधानसभा उपाध्यक्ष शरद तसरे हे पराभूत झाले आहेत. कोषाध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रगती पॅनलचे दिलीपबाबू इंगोले यांनी विकास पॅनलच्या बाळासाहेब वैद्य यांचा १८२ मतांनी पराभव केला. इंगोले यांना ४२४ तर वैद्य यांना २४२ मते मिळालीत. तर सदस्यपदाच्या चारही जागांवर प्रगती पॅनलचे हेमंत काळमेघ ४९०, केशवराव गावंडे ३८७, सुरेश खोटरे ३३१ आणि सुभाष बनसोड २८९ मते घेऊन विजयी झाले आहेत.
संस्थेचे आतापर्यंतचे अध्यक्ष
१) माजी केंद्रीय कृषीमंत्री स्व. भाऊसाहेब तथा पंजाबराव देशमुख, संस्थापक अध्यक्ष : १९३२ ते १९६५
२) बाबासाहेब घारफळकर : १६ मे १९६५ ते २२ मे १९७७
३) भ. मा. उपाख्य रावसाहेब इंगोले : २३ मे १९७७ ते ३१ मे १९८७
४) प्रा. वा. उपाख्य दादासाहेब काळमेघ : १ जून १९८७ ते ९ जुलै १९९३ आणि ५ जून १९९५ ते ३१ मे १९९७
५) वसंतराव धोत्रे : १ जून १९९७ ते ३१ मे २००७
६) महादेवराव भूईभार : १७ नोव्हेंबर १९९३ ते ४ जून १९९५
७) अरूण शेळके : १० जुलै १९९३ ते १६ नोव्हेंबर १९९३, १ जून २००७ ते १४ सप्टेंबर २०१७
८) हर्षवर्धन देशमुख : १५ सप्टेंबर २०१७ ते आतापर्यंत
———————