नंदूरबार (आफताब खान) – महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रेरित हाेऊन नंदूरबारच्या बाल शहिदांनी इंग्रज सरकारच्या विरोधात आंदोलन केले होते. त्यावेळी गोऱ्या अधिकाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात शिरीष कुमार मेहता यांच्यासह पाच जणांनी भारत मातेच्या स्वातंत्र्याचा यज्ञकुंडात आपल्या प्राणांची आहुती दिली होती. आज ९ सप्टेंबर रोजी या बाल शहिदांचा ८० व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना स्मारक चौकात अभिवादन करण्यात आले.
पोलीस दलाच्या वतीने शहिदांना मानवंदना देण्यात आली. यावेळी शहरातील शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी त्यासोबत नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भारत माता की जय, बाल शहीद अमर रहे या घोषणांनी परिसरात देशभक्ति मय वातावरण निर्माण झाले होते. बाल शहिदांच्या स्मृतिदिनानिमित्त आज नंदुरबार शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.