– अनेक घरे फोडली, अमडापूर पोलिस ढाराढूर!
चिखली (एकनाथ माळेकर) – तालुक्यातील अमडापूर पोलिस ठाणेहद्दीत येणार्या डोंगरशेवली येथे चोरट्यांनी धुमाकूळ घालत पत्रकार गजानन दसरकर यांच्या घरी दरोडा घालण्याचा प्रयत्न केला. तसेच, दोन-तीन घरी चोर्या करून पळ काढला. त्याशिवाय, शेलसूर, धोत्रा भनगोजी येथेही या दरोडेखोरांनी चोर्या केल्या आहेत. दरोडेखोरांच्या या धुमाकुळाने ग्रामस्थांत प्रचंड भीती व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अमडापूर पोलिस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात चोरटे, दरोडेखोर यांचा सुळसुळाट झाला असून, चोरट्यांवर पोलिसांचा धाक राहिलेला नाही. डोंगरशेवली येथे पत्रकार गजानन दसरकर यांच्या निवासस्थानी दिनांक ७ सप्टेंबररोजी रात्री साडेतीन वाजता सहा ते सात दरोडेखोर आले, त्यांनी खिडकी तोडून घरात घुसण्याचा प्रयत्न केला असता, दसरकर यांना एकदम जाग आली. त्यांनी आरडाओरड केली असता दरोडेखोर पळून गेले. त्यामुळे पुढील दुर्देवी प्रसंग टळला. तरीही दरोडेखोरांनी पुढे जाऊन डोंगरखंडाळा येथे दोन ते तीन घरात घुसून चोर्या केल्यात. तसेच शेलसुर, आणि धोत्रा भनगोजी या गावांतसुद्धा घरे फोडण्यात आली असून, किती मुद्देमाल चोरीस गेला हे कळू शकले नाही. या दरोडेखोरांच्या उच्छादाबाबत पत्रकार दसरकर यांनी यांनी पोलिसांना माहिती देऊनसुध्दा पोलिसांनी काहीही कार्यवाही केली नाही. परिसरात दरोडेखोर व चोरटे धुमाकूळ घालत असताना अमडापूर गेंड्याची कातडी पांधरून बसले असल्याने ग्रामस्थांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांची रात्रीची गस्त दिसून येत नसून, त्यामुळे दरोडेखोर व चोरट्यांबद्दल ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. याबाबत बीट जमादार शिवाजी बिलगे यांना विचारले असता, त्यांनी या घटनांची माहिती पीएसआय पांडुरंग शिंदे आणि ठाणेदार चतरकर यांना दिली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.