नंदूरबार (जिल्हा प्रतिनिधी) – अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने नंदुरबार शहरातील जय खेतेश्वर स्वीटस्, भारती फूड्स आणि हरी ओम खेतेश्वर स्वीटस् यांची तपासणी त्यांच्याकडून मोतीचुर लाडू, इमारती, खवा आणि नवरतन चिवडा या अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहे. तपासणी वेळी जय खेतेश्वर स्वीटस्, हरी ओम खेतेश्वर स्वीटस् या दुकानांमध्ये मिठाई विक्रेत्यांनी मिठाईवर ‘बेस्ट बिफोर’ दिनांक नमूद केला नसल्याने तसेच अन्नपदार्थ किती दिवस वापरावे याबाबत माहिती दर्शनी भागात लावले नसल्याने दोन्ही दुकानावर कारवाई करण्यात येणार आहे.
सणासुदीच्या दिवसात खवा, मावा, मिठाई, खाद्यतेल, वनस्पती इत्यादी अन्न पदार्थाना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने त्यामध्ये भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनातर्फे या अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या संबंधित आस्थापनांच्या तपासण्या व नमुने घेण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे यांनी दिली आहे.