आमदार पाडवींनी बसने प्रवास करत जाणून घेतल्या विद्यार्थ्यांच्या समस्या
– प्रत्येक थांब्यावर बस थांबते की नाही, हे स्वतः तपासले!
नंदूरबार (आफताब खान) – तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी चक्क स्वतः बसने प्रवास करून, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दररोज भेडसावणार्या विविध समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी बसमध्येच विद्यार्थी व प्रवासी यांच्याशी संवाद साधला. तसेच, प्रत्येक थांब्यावर बस थांबते की नाही, हेदेखील तपासून पाहिले.
आमदार पाडवी यांनी अक्कलकुवा – तळोदा बसने प्रवास करीत, बसमधील विद्यार्थ्यांशी व सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधला. तसेच सदर बस प्रत्येक बसथांब्यावर थांबते का हे स्वतः बघितले. तसेच प्रत्येक बस थांब्यावर बस थांबवण्याचा सूचना त्यांनी बसचा चालक – वाहकाला केल्या आहेत. दरम्यान, आमदार बसमधून प्रवास करीत आहेत, हे दुर्मिळ दृश्य पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. शालेय विद्यार्थ्यांसाठी आमदारांनी बसने प्रवास केल्याने तळोदा तालुक्यात तो एकच चर्चेचा विषय बनला आहे.