BuldanaChikhali

देऊळगावमही सब स्टेशनअंतर्गत विजेचा खेळखंडोबा!

– भारत-पाकिस्तानच्या सामन्यावेळीही लाईन गायब; ‘ऑपरेटर म्हणतो इन्व्हर्टर घ्या’!

चिखली (एकनाथ माळेकर) – देऊळगावराजा तालुक्यातील देऊळगाव मही येथील ३३ केव्हीच्या वीज उपकेंद्राचा कारभार रामभरोसे सुरु असून, येथील कर्मचार्‍यांवर कुणाचाच वचक नसल्याने मोकाट कारभार सुरु असून, या वीज केंद्रांतर्गतच्या सर्व गावांत विजेचा नुसता खेळखंडोबा सुरु आहे. त्यामुळे सर्व गावांमध्ये संतापाची लाट पसरली असून, लवकरच तिचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी या गंभीरबाबीकडे लक्ष देऊन या उपकेंद्राचा कारभार सुधारावा, अन्यथा पाच ते सहा खेड्यांतील ग्रामस्थ व शेतकरी कार्यकारी अभियंता कार्यालयावर धडकणार असल्याची चर्चा या गावांत होत आहे. धक्कादायक बाब अशी, की लाईन गेली की या वीज उपकेंद्रावर फोन केला की तो ऑपरेटर उचलून बाजूला ठेवतो. मोठ्या मुश्किलीने उचलला तर, इतकीच गरज असेल तर इन्व्हर्टर घ्या, असे उर्मटपणे सांगतो. लोकांनी इन्व्हर्टर घ्यायचे असेल, तर मग महावितरणची गरज काय, आणि या ऑपरेटरला तेथे पगार देऊन माशा मारायला ठेवले आहे का, असा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहेत.

देऊळगावराजा तालुक्यातील देऊळगाव मही येथे ३३ केव्ही सब स्टेशन असून, सदर सब स्टेशनवरून तीन कृषीपंप, तीन गावठाण फिटर आहेत. त्यात डीग्रस गावठाण व कृषी, टाकरखेड गावठाण व कृषी, देऊळगाव मही गावठाण व कृषी हे फिटर आहेत. देऊळगाव मही सब स्टेशनमध्ये प्रत्येक फिटर अलग अलग आवश्यक असतांना एकाच व्हीसीबीवर अनेक फिटर जोडून त्या त्या फिटरच्या छोट्या छोट्या समस्या दूर करण्यासाठी संपूर्ण फिटर वारंवार बंद करून ठेवले जात आहे. त्यामुळे इतर गावांना रात्री अपरात्री अंधाराचा सामना करावा लागत आहे. त्यास गावागावात खराब झालेले रोहित्र, त्यात ऑईलची कमी, खराब पेट्या, जळालेले केबल आदी समस्या तर मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या आहेत.


एखाद्या गावात फ्यूज कटल्यास त्या गावात नसलेले एबीस्विच यामुळे संपूर्ण फिटर जनमित्र ऑपरेटर यांना फोन करून बंद करून घेतात, व रात्री अपरात्री वीज पुरवठा का खंडित झाला म्हणून ग्राहक कार्यालयाच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून विचारपूस करण्याचा प्रयत्न करतात. तर यावेळी फोनच उचलला जात नाही, तर काही वेळा ऑपरेटरकडून ग्राहकांना इन्व्हर्टर घेणाचा फुकटचा सल्ला दिला जातो. तसेच २८ ऑगस्टरोजी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या वेळीसुद्धा वीज पुरवठ्यात व्यत्यय आल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तेव्हा वरिष्ठ अधिकारी यांनी तातडीने या वीज उपकेंद्राला शॉक ट्रीटमेंट द्यावी व कारभार सुधारावा, अन्यथा ग्रामस्थांच्या संयमाचा कधीही उद्रेक होण्याचा धोका आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!