नंदूरबार जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार; ‘सिकलसेल’ग्रस्त महिलेला पोलिसांची अमानुष मारहाण!
– दोन दिवसांच्या टाळाटाळीनंतर अखेर अदखलपात्र गुन्हा दाखल
– घटनेची उच्चस्तरीय चौकशी होऊन पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी ऐरणीवर
नंदूरबार (आफताब खान) – नंदूरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील सोनखुर्द जरीपाडा येथील एका महिलेला एका पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस कर्मचार्यांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदरील महिलेच्या पती हा अवैध दारूचा व्यवसाय करतो, असे सांगत या पोलिसांनी २१ ऑगस्टरोजी तिच्या घराची झाडाझडती घेतली. पती घरात न मिळाल्याने सदरील महिलेला या पोलीस कर्मचार्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप महिलेने केला असून, विशेष म्हणजे, सदरील महिला ‘सिकलसेल’सारख्या गंभीर आजाराने ग्रस्त आहे. पोलिस अमानुष मारहाण करत असताना या महिलेने टाहो फोडून आपण सिकलसेलेने आजारी आहोत, असे वारंवार सांगूनदेखील तिला बेदम मारहाण करणार्या पोलिसांना तिची दया आली नाही, असा आरोप या पीडित महिलेने केला आहे.
मानवाधिकाराचे सरळ सरळ उल्लंघन करून एका आजारी महिलेला अमानुष मारहाण करणार्या या पोलिसांवर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. याप्रकरणी दोन दिवसांच्या टाळाटाळीनंतर धडगाव पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. सदरच्या घटनेप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.