– राज्यातील तालुका क्रीडा अधिकार्यांची पदेही भरली जाणार
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – राज्यातील पोलिस दलात लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभेत लक्ष्यवेधी सूचनेला उत्तर देताना फडणवीसांनी ही माहिती दिली. तसेच, राज्यातील तालुका क्रीडा अधिकार्यांची रिक्त पदे १५ दिवसाच्याआत भरली जातील, अशी माहिती क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत दिली.
विधानसभेत देवेंद्र फडणवीस म्हणाले, की राज्यातील विविध शहरांमध्ये पोलीस विभागात मनुष्य बळ कमी पडत आहे. मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आणखी सात हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दुसरीकडे, राज्यात क्रीडा अधिकार्यांची पदभरती होणार आहे, अशी माहिती क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. राज्यातील तालुका क्रीडा अधिकार्यांची रिक्त पदे भरण्याबाबत सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर क्रीडा मंत्री महाजन यांनी उत्तर देताना सांगितले, की महाराष्ट्र शासनाने २००३ च्या शासन निर्णयाद्वारे तालुका क्रीडा संकुले उभारण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यात ३८० तालुका क्रीडा संकुले मंजूर झाली आहेत. सद्यस्थितीत राज्यात १०० क्रीडा अधिकार्यांची पदे मंजूर झाली आहेत, त्यापैकी फक्त २० टक्के पदे भरलेली आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन येत्या आठवड्यात नागरी सेवा मंडळाची तातडीने बैठक घेऊन ४४ पदे भरली जाणार आहेत. याबरोबरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची १५ पदांची मुलाखत प्रक्रिया या महिनाअखेर पूर्ण होईल. अशी ६९ पदे उपलब्ध होणार असल्याचेही महाजन यांनी नमूद केले.