विधानभवनाबाहेर शेतकर्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; अजित पवारांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट!
– अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना ठोस भरपाई देण्याची मागणी
मुंबई (विशेष प्रतिनिधी) – राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना, विधानभवनाबाहेर काल धक्कादायक घटना घडली होती. ग्रामीण भागातून आलेल्या एका व्यक्तीने विधानभवनाबाहेर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. सातारा जिल्ह्यातील कांदळ गावचे शेतकरी सुभाष भानुदास देशमुख (वय ४५) असे या शेतकर्याचे नाव असून, गंभीर जखमी अवस्थेतील या शेतकर्याची राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज जेजे रुग्णालयात जावून भेट घेतली. तसेच, त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. शेतकर्याने विधानभवन परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने पाचव्या दिवशी अधिवेशनात शेतकर्यांच्या मदतीचा प्रश्न चांगलाच तापला होता.
सुभाष देशमुख या शेतकर्यांने विधानभवनाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. शेतकर्याने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, पोलिसांनी आग विझवली. मात्र, या घटनेत संबंधित व्यक्ती भाजली असून व्यक्तीचे संपूर्ण अंग काळेकुट्ठ झाले होते. पोलिसांनी आग नियंत्रणात आणत सुभाष देशमुख यांना उपचारासाठी जे. जे रुग्णालयात दाखल केले. शेतीच्या वादातून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जे. जे रुग्णालयात जाऊन सुभाष देशमुख यांची भेट घेतली व देशमुख यांच्या तब्यतीची चौकशी केली. शेतकर्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने काही काळ विधानभवन परिसरात गोंधळ उडाला होता.
आज पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. चार दिवस वादळी ठरले आहेत. विरोधकांनी विधिमंडळाच्या पायर्यांवर शिंदे, फडणवीस सरकारविरोधात आंदोलन केले. तसेच यावेळी विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. सध्या अधिवेशनात अतिवृष्टीबाधित शेतकर्यांचा मुद्दा गाजत आहे. अतिवृष्टीबाधित शेतकर्यांच्या नुकसानभरपाईचा मुद्दा उपस्थित करत, विरोधकांकडून शिंदे, फडणवीस सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे.