– मिटकरी-रोहित पवार सत्ताधार्यांना भिडले, अखेर अजिततदादा मध्ये पडले
– शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याविरोधात सत्ताधार्यांच्या घोषणाबाजीने वातावरण तापले!
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आज विधिमंडळाच्या परिसरात सत्ताधारी व विरोधकांत जोरदार राडा झाला. शिवसेनेचे बंडखोर नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाविरोधात महाविकास आघाडीचे आमदार बोचरी घोषणाबाजी करत असताना, त्याला सत्ताधारी आमदारांनीही प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यात थेट शरद पवार व उद्धव ठाकरे या नेत्यांविरोधात भाजप व शिंदे गटाने घोषणाबाजी केली. गेल्या चार दिवसांमध्ये विरोधकांनी झोंबरी घोषणाबाजी करून, सत्ताधार्यांना जेरीस आणले होते. परंतु, आज उलटे चित्र दिसून आले. आज सकाळपासून भाजपचे आमदार विधिमंडळाच्या पायर्यांवर आंदोलन करत होते. कोरोना काळातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन या आमदारांनी बॅनर्स झळकावले. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांच्या नेतृत्त्वाखालील विरोधी आमदारही त्याठिकाणी आले. घोषणाबाजीवरून अखेर दोन्ही पक्ष बाचाबाचीवर आले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दोन्ही गटाला शांत केल्याने, मोठा राडा टळला.
आज सकाळी अधिवेशनाला सुरुवात होताच, विधिमंडळाच्या पायर्यांवर सत्ताधार्यांचे आंदोलन सुरु होते. यावेळी कोरोनाकाळात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. या घोषणाबाजीत शरद पवार यांच्या विरोधातही घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि अमोल मिटकरी हे संतापले. या दोघांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडीचे आमदारही त्याठिकाणी आले. त्यांच्या आमदारांनीही फलक झळकावत सत्ताधार्यांविरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. महाविकास आघाडीच्या आमदारांनी गाजराच्या माळा आणल्या होत्या. ‘गाजर देणं बंद करा, ओला दुष्काळ जाहीर करा’, अशी घोषणाबाजी केली. गाजर हाती घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या. या घोषणांमुळे सत्ताधारी आमदार संतापले. त्यामुळे सत्ताधारी-विरोधक आमने-सामने आले. सत्ताधारी पक्षानेदेखील ‘लवासातील खोके एकदम ओके!’ अशा घोषणा दिल्या. सत्ताधारी आणि विरोधकांची अशी घोषणाबाजी सुरु असताना अचानक धक्काबुक्की सुरु झाली आणि जोरदार राडा झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारदेखील विधान भवनाच्या पायर्यांवर आले. त्यांनी ठाकरे गटाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत, निदर्शने केली. त्याचवेळी आमदार आदित्य ठाकरे हे त्यांच्या समर्थक आमदारांसह आले. ठाकरे गट आणि शिंदे गटाचे आमदार आमने सामने आल्यानंतर गोंधळात आणखी भर पडली.
दोन्ही बाजूचे आमदार आक्रमक असल्यामुळे बाचाबाचीचा प्रकार घडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी हे रागाच्या भरात सत्ताधारी आमदारांच्या अंगावर धावून जाताना दिसत होते. त्यामुळे विधिमंडळाच्या परिसरात प्रचंड गदारोळ माजला होता. अखेर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मध्ये पडत विरोधी पक्षाच्या आमदारांना बाजूला नेले. सत्ताधारी आमदारांनाही त्यांनी शांत राहण्यास सांगितले, त्यामुळे पुढचा अनर्थ टळला.