मूलभूत नागरी सुविधा द्या, अन्यथा कर भरण्यास दिला नकार
धुळे (ब्युराे चीफ) – मालमत्ता कराची पठाणी वसुली करणारी धुळे महानगरपलिका मात्र सुविधांच्या बाबतीत सपशेल अपयशी ठरली असल्याचा आरोप करत धुळे शिवसेनेच्यावतीने आज महानगरपालिका आवारात वाढीव बिलाची होळी करत आयुक्त, सभापती व महानगरपलिका प्रशासनाचा निषेध केला.
जय भवानी जय शिवाजी, आवाज कुणाचा, शिवसेनेचा… अशा घोषणांनी महापालिका परिसर दणाणून सोडला होता. नव्याने ११ गावांचा धुळे महानगरालिकेत समावेश झाल्यानंतर नागरिकांना उपयुक्त सुविधा मिळतील याचा आनंद झाला होता. मात्र भ्रष्टाचाराची कीड लागलेल्या प्रशासन व लोकप्रतनिधींकडून नागरिकांच्या भावनांशी खेळ खेळला जात असल्याचा आरोप करत, सुविधाच नाही तर कर कशाला असा सवाल करत, शिवसेनेने आज आंदोलन केले. नागरिकांना मूलभूत सुविधा द्या; अन्यथा कर भरणार नाही, असा पवित्रा घेत शेकडो महिला व पुरुष आज शिवसेनेच्या नेतृत्वात महापालिकेत जमले होते.