3 ऑगस्ट रोजी शिक्रापूर इथं दोन गाड्यांनी पाठलाग केला होता, असा खुलासा मेटेंचे सहकारी अण्णासाहेब मायकर यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. त्यांच्या या आरोपानंतर ज्या इर्टिगा गाडीने पाठलाग केला होता. त्या गाडीची ओळख पटली आहे. MH -TD-8239 असा या गाडीचा नंबर आहे. 3 ऑगस्ट रोजी विनायक मेटे यांचा पाठलाग करणारी हीच गाडी होती असा दावा अण्णासाहेब मायकर यांनी केला आहे.
– मेटेंच्या अपघाती निधनावरून महाराष्ट्राच्या मनात पराकोटीचा संशय
– राक्षसभुवन येथील गोदावरीगंगेत अस्थिंचे विसर्जन
बीड/मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री विनायक मेटे यांचे अपघाती निधन हे घातपात असल्याचा संशय राज्यभर निर्माण झाला आहे. त्यातच, मेटे यांच्या सहकार्याचा फोन रेकॉर्ड कॉल व्हायरल झाला असून, अण्णासाहेब मायकर असे त्यांचे नाव आहे. मायकर हे ३ ऑगस्टला मेटे यांच्यासोबतच प्रवास करत होते. यावेळी शिक्रापूरपासून दोन किलोमीटरपर्यंत मेटे यांच्या गाडीचा अज्ञात आयशर ट्रक व दोन गाड्या पाठलाग करत होत्या, ही बाब चव्हाट्यावर आली आहे. त्यामुळे रविवारी (दि.१४) मेटे यांच्या गाडीला झालेला अपघात हा पूर्वनियोजित कट असावा, अशा संशय बळावला असून, तसे असेल तर मेटे यांचा इतका निर्घृण खून कुणी? आणि का केला असावा?, मेटे यांचा इतका नियोजनबद्धपणे खून करणारी ‘महाशक्ती’ कोण असावी? अशा नानाविध शंका-कुशंका महाराष्ट्राच्या मनात निर्माण झालेल्या आहेत.
दरम्यान, आज विनायक मेटे यांच्या अस्थी देशातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असणार्या श्री क्षेत्र राक्षसभुवन येथील गोदावरी गंगा नदीत विसर्जित करण्यात आल्या. यावेळी मेटे यांची कन्या आकांक्षा, बंधू त्रिंबक यांच्यासह बहिणी, नातेवाईक आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. विनायक मेटे यांच्या अकाली निधनाने मोठी राजकीय आणि सामाजिक हानी झाली असून, कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, असे मत आजही अनेकांनी नदीकाठी व्यक्त केले. दुसरीकडे, मेटे यांच्या अपघाती निधनावर संशयाचे मोठे चिन्ह निर्माण झालेले आहे. अण्णासाहेब मायकर यांच्या व्हायरल झालेल्या फोन कॉल रेकॉर्डमधील संवादानुसार, तीन ऑगस्टला विनायक मेटे यांच्यासोबत ते मुंबईकडे जात होते. त्यावेळी शिक्रापूरपासून दोन किलोमीटर अंतरापर्यंत दोन गाड्या पाठलाग करत होत्या. यामध्ये आयशर ट्रकदेखील होता. शिक्रापूरपासून ही गाडी पाठलाग करत होती, ती गाडी कधी पाठीमागे राहत होती तर कधी ओव्हरटेक करून पुढे जात होती, यामध्ये आयशर एक ट्रक सुद्धा होता, त्यामुळे आम्हाला काही पुढे जाता येत नव्हते, अशी माहिती मेटेंचे सहकारी अण्णासाहेब मायकर यांनी दिलेली आहे. शिवसंग्रामचे कार्यकर्ते असलेले अण्णासाहेब मायकर हे झी २४ तास या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना हाच दावा करताना दिसले आहेत. ते म्हणाले, की ३ ऑगस्टला मी साहेबांसोबत होतो, शिक्रापूर येथे २.५ किमी आमच्यापुढे आयशर गाडी होती. तेव्हा एक चारचाकी गाडीही होती, त्यामध्ये दोन ते चारजण होते. त्या गाडीने आम्हाला दोन वेळा कट मारला. गाडी पुढे घेण्यासाठी आम्हाला हात करत होते. त्यावेळी साहेब म्हणाले, गाडी आयशर मागेच असूद्यात आपल्याला मीटिंगला उशीर झाला आहे. तेव्हा आम्ही बीडहून मुंबईला निघालो होतो. याबाबत दुसर्या दिवशी भाचा आकाश जाधव याच्याशी चर्चा केली असल्याचेही मायकर यांनी या वृत्तवाहिनीला सांगितले आहे.
मायकर यांच्या या गौप्यस्फोटामुळे मेटे यांचा घातपात करण्याचा कुणी तरी डाव रचला होता, अशा संशयाला बळ मिळत असून, पनवेल येथे इतका भीषण अपघात झाल्यानंतर, मेटेंच्या गाडीच्या चालकानेही आपल्याला मदत मिळायला उशीर झाल्याचे म्हटले होते. मेटे यांचा मुंबईकडे जात असताना खालापूर टोलनाक्याजवळ अपघात झाला होता. तब्बल तासभर मेटे यांना कुणाचीही मदत मिळाली नाही, असे त्यांचा चालक एकनाथ कदम याने वृत्तवाहिन्यांना सांगितले आहे. त्यामुळे मेटे यांचा अपघात नसून, घातपात असल्याचा दाट संशय बळावला आहे. तसे असेल तर मग मेटे यांचा घातपात कोणती ‘महाशक्ती’ करू शकते? आणि का करू शकते? असाही प्रश्न निर्माण होत आहे.
‘
अपघात झाल्यानंतर माझं कारचालक एकनाथ कदम याला सातत्याने एकच म्हणणं होतं की, साहेबांशी बोलणं करून दे. साहेबांच्या दोन्ही नंबरवर मी फोन केले, पण ते फोन उचलत नव्हते. माझं त्यांच्याशी बोलणं झालं नाही तर मला वाटत होतं किमान सुरक्षारक्षकाशी तरी बोलणं व्हावं, कारण तोपर्यंत मला माहीत नव्हतं की सुरक्षारक्षकही जखमी आहे. मात्र एकनाथ हा कोणाशीच बोलणं करून देत नव्हता. तो एकमेव व्यक्ती होता ज्याला हे सगळं कसं झालं हे माहीत आहे. मग साहेबांचा मृत्यू झाला आहे हे त्याला माहीत होतं का? किंवा नसेल झाला तर त्याने वैद्यकीय मदत मागितली का? असे सगळे मुद्दे अनुत्तरित आहेत,’ असे विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे.
विनायक मेटे साहेब हे आमचे दैवत. त्यांच्याबाबतीत जे घडले ते आमच्या विचार करण्याच्या पलीकडचे आहे. परंतु त्यांच्या अपघाताची चौकशी होऊन लवकरात लवकर सत्य बाहेर यावे इतकीच अपेक्षा आहे. अन्यथा, शिवसंग्राम महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरेल, असा इशारा शिवसंग्रामच्या महिला जिल्हाध्यक्षा आणि पदाधिकार्यांनी आज बीड येथे सरकारला दिला आहे. मेटे यांच्या वाहनास तीन ऑगस्टदरम्यान शिक्रापूर या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न झाला होता. हा घाट पूर्वीपासूनच होता. त्यामुळे मेटे साहेबांच्या अपघाताची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सखोल चौकशी करावी. दोषींवर कडक कारवाई करावी. अन्यथा, शिवसंग्राम महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरेल, असा इशाराही शिवसंग्रामच्या पदाधिकार्यांनी दिला आहे.