पुणे (प्रतिनिधी) – नाशिक येथील सुतार समाजाचे नेते, सामाजिक कार्यकर्ते व प्रभावी वक्ते दिलीप पेंढारे यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने सुतार समाजाच्या विविध संघटनांसह अनेक संघटनांनी तीव्र शोक व्यक्त करत, श्रद्धांजली अर्पण केली आहे. पेंढारे यांच्या निधनाने समाजात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना सुतार समाज सजग मंचचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मिलिंद पेंढारकर व औरंगाबाद येथील विश्वकर्मा मंदीराचे संस्थापक अध्यक्ष अशोक पगार यांनी व्यक्त केली आहे.
नाशिक जिल्ह्यातील वणी येथील दिलीप पेंढारे हे सुतार समाजातील अग्रणी नेतृत्व होते. हरहुन्नरी समाजसेवक, उत्तम समाज संघटक, आणि अनेक सामाजिक कार्यात ते अग्रणी होते. त्यांचा सर्वच राजकीय पक्षांच्या नेतृत्वाशी चांगला संपर्क होता. सुतार समाजाच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. समाजाच्या विविध उपक्रमांचे आयोजन व हिरिरीने सहभाग हा त्यांचा असायचा. गरजुंना मदत मिळवून देण्यासाठी ते पुढाकार घेत असतं. आज त्यांचे दुर्देवी निधन झाल्याने, सुतार समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाबद्दल सुतार समाज धर्मशाळा, त्र्यंबकेश्वर, नाशिकसह विविध सामाजिक संघटनांनी पेंढारे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. सुतार समाज सजग मंच व श्रमिक सुतार समाज संघटनांच्यावतीनेही त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आलेली आहे.
Leave a Reply