नंदुरबार (आफताब खान) – जागतिक आदिवासी दिनानिमित्त तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातंर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबारच्यावतीने आज भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीस जिल्हा पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील तसेच प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरवात करण्यात आली. सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांनीही ठेका धरत, विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्राेत्साहित केले.
या भव्य रॅलीत शासकीय आदिवासी आश्रमशाळा व शासकीय वसतीगृहातील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी पारंपारीक आदिवासी वेशभुषा, ढोल, पावरी, शिबली, पावरा नृत्य अशा विविध पोशाखात लयबद्ध पद्धतीत सुंदर नृत्य यावेळी सादर करण्यात आले. जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने रॅलीत ‘सुदृढ आरोग्य एकच ध्यास, कुपोषणाचा चुकवू फास’, ‘चला शिक्षण घेऊया, देश प्रगती पथावर नेऊ या’, ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’, ‘मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी! बालविवाह’, यासह कुपोषण, अमृत आहार, आरोग्य विषयावरील घोषवाक्य सादर करीत रॅलीस छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरापासून सुरु करण्यात येवून महाराणा प्रताप चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.
या रॅलीत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील सहायक प्रकल्प अधिकारी एस. एन. काकडे, के. एस. मोरे, जीजा पाडवी, एम. एस. चौधरी, एस. एस. पटेल, सायराबानु हिप्परगे तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सुमारे १ हजार विद्यार्थी व विद्यार्थीनी, नागरिक सहभागी झाले होते.