हेमंत चौधरी
सोलापूर – राज्य मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार अखेर उद्या होऊ घातला आहे. सकाळी ११ वाजता शिंदे गट व भाजपचे प्रत्येकी सहा मंत्री शपथ घेतील, असे सांगितले जात आहे. असे असले तरी या मंत्रिमंडळ विस्तारात सोलापूरला मात्र संधी मिळालेली नाही. सोलापूरच्या दोन्ही देशमुखांचा पत्ता कट झाला असल्याची खात्रीशीर माहिती भाजपच्याच वरिष्ठांनी औपचारिक चर्चेतून नाव उघड न करण्याच्या अटीवर दिली आहे. या दोन्ही देशमुखांचा परफॉर्मन्स पक्षाला चांगला वाटलेला नाही. सोलापूर महापालिकेत सत्ता आल्यानंतर विचार करता येईल, असे हा नेता खासगीत बोलताना म्हणाला आहे.
माजी मंत्री विजयकुमार देशमुख व सुभाष देशमुख या दोघांनाही उद्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान नाही. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते चलबिचल करत असल्याचे दिसून आले. उद्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बहुतांश संभाव्य मंत्र्यांना दुपारपर्यंत निरोप गेले आहेत. पहिल्याच यादीत शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा नंबर लागला असून, त्यांनी साईसमाधीचे दर्शन घेऊन मुंबईकडे प्रयाणदेखील केले होते. सोलापुरात दोन्ही देशमुख निरोप येण्याची वाट पाहात होते. मंत्रिपदासाठी दोन्ही देशमुखांची मोठी गटबाजी व शक्तिप्रदर्शन चालत असते. परंतु, आता मंत्रिपदे कमी आणि इच्छुक जास्त अशी परिस्थिती असल्याने, सद्या हे दोन्ही नेत्यांनीही शांत बसणे पसंत केले आहे. मागील खेपेला सुभाषबापू देशमुख यांच्याकडे सहकार मंत्रालय होते. यावेळेस ते राधाकृष्ण विखे पाटलांकडे जाण्याची शक्यता आहे. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे महसूल मंत्रीपद कायम राहणार आहे. मागील खेपेला ते महसूलमंत्री होते.
सोलापूर महापालिका निवडणूक तोंडावर आली आहे. या निवडणुकीत दोन्ही देशमुख सत्ता आणतात की नाही, यावर त्यांचे मंत्रिपद ठरणार असल्याचे सांगण्यात आले आहे. महापालिकेत भाजपची सत्ता असतानाही, या दोन्ही नेत्यांना आपला ठसा शहरात उमटवता आला नाही. धरण शंभर टक्के भरले असतानाही सद्या चार दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने सोलापूरकर त्यांच्यावर प्रचंड नाराज आहेत. तसेच, स्मार्ट सिटीची कामे तर गोगलगायीच्या गतीने सुरु आहेत. या दोन्ही नेत्यांच्या कामांचा परफॉर्मन्स पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलेला आहे. त्यामुळेच चंद्रकांतदादा सकारात्मक असले तरी, फडणवीस यांनी या दोन्ही नेत्यांना तूर्त वेटिंगवर ठेवले असल्याचे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचे म्हणणे आहे.
अब्दुल सत्तारांना परीक्षा घोटाळा भोवला?
राज्य मंत्रिमंडळात शिक्षण मंत्रिपदी वर्णी लावण्यासाठी शिवसेनेचे बंडखोर नेते आ. अब्दुल सत्तार यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. ते अगदी दिल्लीपर्यंत धडक मारून आलेले आहेत. मंत्रिमंडळात तुमची वर्णी निश्चित आहे, शिक्षण की अन्य खाते ते नंतर पाहू, असा शब्दही सत्तारांना देण्यात आला होता. परंतु, उद्या मंत्रिमंडळ विस्तार अन आज सत्तारांच्या मुलींचा टीईटी परीक्षा घोटाळ्याचा मुद्दा चव्हाट्यावर आला. सत्तारांनी स्पष्टीकरण दिले असले तरी, तूर्त त्यांना वेटिंगला ठेवण्याचाच पर्याय भाजप नेतृत्वाने स्वीकारला असल्याचीही खात्रीशीर माहिती हाती आली आहे. टीईटी परीक्षेत गैरप्रकार केलेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यात सत्तार यांच्या चार मुलांची नावे आहेत. सत्तार यांच्या तीन मुली आणि एका मुलाचे प्रमाणपत्रही रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे सत्तार अडचणीत सापडले आहेत. पहिल्याच अधिवेशनात टीईटी घोटाळा गाजणार असल्याने सुरुवातीलाच नख लागू नये, म्हणून सत्तार यांना पहिल्या विस्तारातून वगळण्यात येणार असल्याचे खात्रीशीर सूत्राने सांगितले आहे. तर काही नेते सत्तार यांनी थेट दिल्लीपर्यंत जाण्याचे धाडस करण्याची काही गरज नव्हती. त्यामुळेच ते वरचढ होण्याची शक्यता पाहाता, त्यांचाही एकनाथ खडसे, किंवा पंकजा मुंडे करण्याची रणनीती राज्याच्या राजकारणात तयार होत असल्याचे एका वरिष्ठ नेतृत्वाने सांगितले आहे.
(लेखक हे वरिष्ठ पत्रकार असून, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या पश्चिम महाराष्ट्र विभागाचे संपादक आहेत. संपर्क ९७६५५६६२१०)