आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील विविध सेवाभावी संस्था,संघटनांचे वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, समाज प्रबोधन, साहित्य ग्रंथ दिंडी, कवी संमेलन, गुणवंत विध्यार्थी सत्कार, कोरोना योद्धा पुरस्कार वितरण सन्मान सोहळा आदी कार्यक्रमाचे आयोजन सोमवार ( दि. १ ) आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फाउंडेशन खजिनदार सुरेशनाना झोंबाडे यांनी दिली.
आळंदी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने जयंतीचे कार्यक्रमाचा प्रारंभ होणार आहे. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य ग्रंथाची दिंडी सकाळी आठ वाजता नगरपरिषद चौकातून निघेल, अशी माहिती फाउंडेशनचे सचिव सूर्यकांत खुडे यांनी दिली.
ग्रंथ दिंडी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक नियोजित जागेत आल्यानंतर प्रतिमा पूजन, अभिवादन, पुष्पहार अर्पण करून पुष्पांजली अर्पण होईल. यावेळी प्रमुख मान्यवरांचे स्वागत, सत्कार,मनोगते होणार आहे. या नंतर शिवकन्या प्रा.कु. श्रद्धा शेट्ये यांचे व्याख्यान, महापुरुषांच्या गीतांचा स्वरलवण्या हा कार्यक्रम यश लिखे, कु. राजलक्ष्मी लिखे सादर करणार आहेत.
या कार्यक्रमात कवी संमेलन तसेच शालेय गुणवंत मुलांचा सत्कार आणि कोरोना काळात विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा कोरोना योद्धा सन्मान सोहळा होत असल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष नानासाहेब साठे यांनी सांगितले. याप्रसंगी आमदार दिलीप मोहिते पाटील, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट, आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक डॉ. रामशेठ गावडे यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवर, आळंदी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक पदाधिकारी, शासकीय, अशासकीय सेवाभावी संस्थाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या जयंती उत्सवास सर्वानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आळंदी शहर झोपडपट्टी सुरक्षा दलाचे प्रमुख मार्गदर्शक संतोष सोनवणे यांनी केले आहे.