– श्री गजानन, जय गजाननाच्या जयघोषाने लोणार नगरी दुमदुमली
लोणार (रामेश्वर आघाव) – पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी भूवैकुंठ पंढरपूरला गेलेल्या श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास सुरु असून, या पालखी सोहळ्याचे जगप्रसिद्ध लोणार नगरीत जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी श्री गजानन, जय गजाननाच्या जयघोषाने लोणार नगरी दुमदुमून गेली होती. यावेळी आकाशभाऊ मित्र मंडळाच्यावतीने वारकरी बांधवांना फराळाचे वाटप करण्यात आले होते. भाविक-भक्तांनी श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. हा पालखी सोहळा लोणार नगरीत मुक्कामी थांबला असून, टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष यामुळे हे ऐतिहासिक शहर भारावून गेले आहे. उद्या सकाळी पालखी सोहळा सुलतानपूरकडे मार्गस्थ होणार आहे. रात्री उशिरापर्यंत भाविकांची दर्शनासाठी गर्दी कायम होती.
शेगावीचा राणा श्री गजानन महाराजांचा पालखी सोहळा, पंढरपूरची आषाढवारी उरकून शेगावकडे परतीच्या मार्गावर आहे. या पालखीचे दुपारी साडेचार वाजता लोणार येथे आगमन झाले. यावेळी भाविकांनी मोठ्या भक्तीभावाने व उदंड उत्साहात पालखीचे स्वागत केले. अनेकांनी पालखी मार्गावर रांगोळी काढली होती. येथे श्रीच्या पालखीमधील भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे श्रीच्या पालखीचे स्वागत, पोलीस स्टेशन व लोणारवासीयांच्यावतीने करण्यात आले. पोलीस स्टेशनचे पीएसआय आहिरे साहेब व कर्मचार्यांनी चोख बंदोबस्त ठेवून सुव्यवस्थेसाठी परिश्रम घेतले. श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती. पालखी सोहळ्यानिमित्ताने शहराला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. पंचक्रोशीतील नागरिकांनी श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
————
Leave a Reply