– पतसंस्थेचा विस्तार करणार, सेवाकार्यात तंत्रज्ञान, अत्याधुनिकता आणणार : आत्मानंद थोरहाते
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – हिवरा आश्रम येथील संत शुकदास महाराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी आत्मानंद थोरहाते यांची तर उपाध्यक्षपदी प्रवीण पडघान यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. कोरोना कालावधीत या पतसंस्थेची निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडली होती. अखेर ती बिनविरोध पार पडल्याने सभासदांनी आनंद व्यक्त केला आहे.
स्व. आबासाहेब तथा परशराम बळीराम थोरहाते हे या संस्थेचे मुख्य प्रवर्तक आहेत. ग्रामीण भागात सहकाराच्या माध्यमातून आर्थिक विकास साधण्यासाठी या पतसंस्थेची त्यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी स्थापना केली होती. आज त्यांचेच सुपुत्र तथा विवेकानंद आश्रमाचे सहसचिव आत्मानंद थोरहाते यांची अध्यक्षपदी बहुमताने निवड झाली. पतसंस्थेचा विस्तार, तिला बँकिंग सेवांच्या तंत्रज्ञानासह अत्याधुनिकता देणे, पतसंस्थेचे भागभांडवल वाढवण्यावर विशेष भर देणार असल्याचे नवनियुक्त अध्यक्ष आत्मानंद थोरहाते यांनी सांगितले.
पतसंस्थेचे माजी अध्यक्ष तथा विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष निस्सीम सेवाव्रती पू. आर. बी. मालपाणी यांच्या अध्यक्षतेखाली पतसंस्थेच्या सभासदांची बैठक पार पडली. या बैठकीत अध्यक्षपदासाठी आत्मानंद थोरहाते यांचे नाव पू. मालपाणी यांनी सूचविले. त्याला विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष तथा सभासद अशोक थोरहाते, आश्रमाचे सचिव तथा सभासद संतोष गोरे यांनी अनुमोदन दिले. त्यानुसार, अध्यक्षपदी आत्मानंद थोरहाते, उपाध्यक्षपदी प्रवीण पडघान, कार्यकारी संचालकपदी पुरुषोत्तम अकोटकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उर्वरित संचालक मंडळ असे, अशोक थोरहाते, प्रदीप पडघान, विनायक गोरे, दयानंद थोरहाते, शरद म्हस्के, रवीप्रकाश घोंगडे, संजय जटाळे, राजेश रौंदळकर, सौ. ज्योती वायाळ, सौ. जयश्री भारस्कर व दीपक थोरहाते यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. नवनियुक्त पदाधिकारी व संचालक मंडळाला पूज्यनीय आर. बी. मालपाणी यांनी आपले आशीर्वाद देऊन सचोटीने व्यवहार करण्याचा सल्ला दिला आहे.
पतसंस्थेचा कार्यविस्तार, भागभांडवल उभारणी आणि बँकिंग तंत्रज्ञानासह सेवेत अत्याधुनिकता आणणार : आत्मानंद थोरहाते
ज्येष्ठ समाजसेवक तथा विवेकानंद आश्रमाचे माजी विश्वस्त स्व. आबासाहेब थोरहाते यांनी संत शुकदास महाराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची स्थापना करण्यासाठी पुढाकार घेत, अहोरात्र मेहनत घेतली होती. अगदी खेडोपाडी जाऊन त्यांनी भांडवल उभारणी केली. मनोहरभाऊ गिर्हे, नारायण भारस्कर, पंढरीनाथ शेळके यांनी त्यांना खंबीर साथ दिली, व या पतसंस्थेची निर्मिती झाली. ग्रामीण भागातील गोरगरिबांना, गरजुंना सुलभ अर्थपुरवठा व्हावा, व त्यांचा आर्थिक विकास व्हावा, अशी स्व. आबांची इच्छा होती. अर्थसाक्षर समाजाने बचतीकडे वळावे, आर्थिक समृद्धी निर्माण करावी, अशी त्यांची अपेक्षा होती. आपण अध्यक्ष म्हणून आबासाहेबांच्या याच स्वप्नांची पूर्तता करणार आहोत. या पतसंस्थेची स्थापना करतानाच पतसंस्थेच्या सेवेत बँकिंग तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिकता आणणे, तिचा कार्यविस्तार करणे, आणि भागभांडवल वाढवणे, असा सल्ला निष्काम कर्मयोगी संत पू. शुकदास महाराजश्रींनी दिला होता. त्या सल्ल्याचीही पूर्तता आपण करणार आहोत. उत्तम आर्थिक शिस्त तर आहेच, पण पतसंस्थेच्या माध्यमातून सर्वोत्तम आर्थिक व्यवहार करण्यावर आपला भर असेल, असे प्रतिपादन नवनियुक्त अध्यक्ष आत्मानंद थोरहाते यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना व्यक्त केले. या पतसंस्थेला पू. शुकदास महाराजश्रींचे नाव आहे, हे नाव सार्थ करण्यासाठी आपण शेवटच्या श्वासापर्यंत कष्टरत राहू, असेही ते म्हणाले.