– श्री सरस्वती विद्यालयाला दिले ‘वाटर कुलर’ भेट!
बुलढाणा /देऊळगाव साखरशा (जिल्हा प्रतिनिधी) – शिक्षण घेतल्याने माणूस घडतो व आत्मनिर्भरही होतो, माझे आयुष्य घडविण्यात सरस्वती विद्यालाचाही मोलाचा वाटा आहे, असे या शाळेचे माजी विद्यार्थी राजू राठी यांनी आपल्या भाषणात सांगितले. आपण ज्याच्याकडून काही घेतो, परतफेड म्हणून त्यालाही काही देणे लागते, याच दातृत्वाच्या भावनेतून देऊळगाव साकरशा येथील श्री सरस्वती विद्यालयाचे माजी विद्यार्थी राजू राठी यांनी आपल्या आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ सदर शाळेला वाटर कुलर आज (दि.२२) भेट देवून विद्यार्थ्यांसाठी थ़ंड पाण्याची सोय केली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
देऊळगाव साखरशा येथील राजू राठी हे पुणे येथे शिकवणी वर्ग घेतात. त्यांचे शिक्षण देऊळगाव साखरशा येथीलच श्री सरस्वती विद्यालयात झाले आहे. या शाळेत शिकूनच आपण चांगल्या हुद्द्यावर काम करत असल्याने, आपण कर्तव्य समजून शाळेला काहीतरी दिले पाहिजेत, या दातृत्वाच्या उदार भावनेतून राजू राठी यांनी आई स्व.देवकाबाई राठी व वडील स्व.मोतीलाल राठी यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री सरस्वती विद्यालयास आज, दि. २२ ऑक्टोबररोजी वॉटर कुलर भेट देऊन विद्यार्थ्यांसाठी थंड पाण्याची सोय करून दिली. सुरुवातीला राधेश्याम राठी व सौ. सविता राठी यांनी फीत कापून वाटर कुलरचे उद्घाटन केले. यावेळी राठी परिवाराचा शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सरस्वती शिक्षण समितीचे उपाध्यक्ष रतन दुगड होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सचिव शाम गट्टाणी, संचालक गोपाल लाड, रितेश दुगड, पाचपवार सर, फत्तुशेठ राठी, पन्नालाल बेगाणी, डॉ. हेमराज राठी, डिगांबर ढवळे, रमेश नहार, महेश राठी, दिलीप बेगाणीसह आदिंची प्रमुख उपस्थिती होती. संस्था सचिव शाम गट्टाणी यांनी शाळेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेऊन वीटभट्टीवरील तसेच शेतमजूर यांना शिक्षकांनी मार्गदर्शन करावे, अशी सूचना केली. प्रास्ताविक प्राचार्य खोरखेडे यांनी केले. संचलन पुरुषोत्तम चवरे तर आभार प्रदर्शन शिक्षक कोळी यांनी केले. यावेळी सरस्वती विद्यालय व सरस्वती आश्रम शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.