उर्वरित शेतकर्यांना पीकविमा रक्कम मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही!
- शेतकरी नेते डॉ. ज्ञानेश्वर टाले व ऋषांक चव्हाण यांना पीकविमा कंपनीसह सत्ताधार्यांना ठणकावले!
– उकळी-सुकळी येथे शेतकर्यांचा मेळावा; डॉ. ऋतुजा चव्हाण यांना मतदारसंघातून जोरदार प्रतिसाद!
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – मेहकर- लोणार मतदारसंघात पीकविमा योजनेसंदर्भात शेतकर्यांच्या खूप तक्रारी आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे उभ्या पिकांची नासाडी होत आहे. तरीही पीकविमा कंपनीकडून नुकसानग्रस्त शेतकर्यांना पीकविम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ चालू आहे. नुकसानग्रस्त शेतकर्यांना पीकविम्याची रक्कम मिळवून देईपर्यंत, स्वस्थ बसणार नाही, आता शेतकर्यांची हेळसांड थांबवा, असे आव्हान शेतकरी नेते डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी उकळी-सुकळी येथील शेतकर्यांच्या मेळाव्यात सत्ताधार्यांना दिले.
मेहकर मतदारसंघातील उकळी-सुकळी येथे पीकविमा तक्रारीसंदर्भात शेतकर्यांच्या आढावा बैठकीत डॉ. टाले बोलत होते. या बैठकीला शेतकरी नेते ऋषांक चव्हाण यांच्यासह दशरथ बोरे, गोपाल मंजुळकर, मोहन नवले, सिद्धू बोरे यांच्यासह शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी डॉ. ज्ञानेश्वर टाले व ऋषांक चव्हाण यांनी शेतकर्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या आढावा बैठकीत परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. शेतकर्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बैठकीला लाभला होता.
शेतकर्यांची थट्टा खपवून घेतली जाणार नाही : ऋषांक चव्हाण
शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर व डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वामध्ये डॉ. ऋतुजा चव्हाण सातत्याने लढा देत आहेत. आज पीकविमा कंपनीकडून शेतकर्यांना नुकसान भरपाई पीकविमा मिळत नसल्याने शेतकर्यांमध्ये तीव्र संताप दिसत आहे. या शेतकर्यांना न्याय देण्याचे काम डॉ. ऋतुजा चव्हाण करीत आहेत. पीकविमा कंपन्यांनी उर्वरित शेतकर्यांना नुकसान भरपाई पीकविमा द्यावा, आणि द्यावाचं लागेल. पीकविमा कंपन्यांकडून चाललेली शेतकर्यांची थट्टा आम्ही कदापि सहन करणार नाही, असा निर्वाणीचा इशारा पीकविमा कंपन्यांना ऋषांक चव्हाण यांनी दिला आहे. विनाकारण पीकविमा कंपन्यांकडून होणारी शेतकर्यांची थट्टा आम्ही खपवून घेणार नाही, असेही त्यांनी पीकविमा कंपनीला ठणकावले.