तुपकर, की बुधवत, की शेळके?
- शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पुढे राजकीय पेच?
– जिल्ह्यात विधानसभेसाठीही लोकसभेचीच पुनर्रावृत्ती होण्याची शक्यता?
– रविकांत तुपकर हे आंबेडकरांच्याही संपर्कात; अपक्ष लढले तरी महाआघाडीला सहाही मतदारसंघात फटका निश्चित?
बुलढाणा (खास प्रतिनिधी) – शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना महाआघाडीत घेऊन त्यांना बुलढाण्यातून उमेदवारी द्यावी, याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह बहुतांश वरिष्ठ नेत्यांचे एकमत झाले असताना, शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे मात्र निष्ठावंत की उपरा? असा प्रश्न निर्माण झाला असून, निष्ठावंत जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, की शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना उमेदवारी द्यावी, की अॅड. जयश्रीताई शेळके यांना संधी द्यावी, असा गहन आणि मोठा राजकीय पेच उद्धव ठाकरे यांच्यापुढे निर्माण झाला असल्याची खात्रीशीर माहिती वरिष्ठस्तरीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. रविकांत तुपकर यांना महाआघाडीत घ्यावे, जेणे करून लोकसभेची पुनर्रावृत्ती टाळता येईल, व त्यांचा बुलढाणा जिल्ह्यासह मराठवाडा व विदर्भातील काही जागांवर राजकीय फायदा होईल, असा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह महाआघाडीच्या काही नेत्यांना विश्वास असल्याचे कळते आहे. तर तुपकरांना बुलढाण्यातून उमेदवारी दिल्यास आम्ही राजकीय संन्यास घेऊ, अशी धमकी जिल्ह्यातील काही स्थानिक नेत्यांनी दिल्याचीही जोरदार चर्चा बुलढाण्यात रंगते आहे. त्यामुळे ठाकरे यांच्यासमोर निर्णय घेण्याचे मोठे आव्हान निर्माण झालेले आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत या शिवसेना (ठाकरे) नेत्यांसह ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. महाआघाडीसोबत येण्यास तुपकर यांनी तयारी दर्शविली असून, वेळप्रसंगी जेथे त्यांचा प्रभाव आहे, तेथे महाआघाडीला सहाय्य करण्याचीही तुपकरांनी तयारी दर्शविली होती. खुद्द उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत यांनीही लोकसभेला झालेली चूक विधानसभेला होऊ नये, यासाठी आपण महाआघाडीसोबत येऊन ‘मशाल’ हाती घ्या, अशी सूचना तुपकरांना केली होती. त्यालाही तुपकर तयार झाले होते, अशी माहिती सूत्रांकडून कळते आहे. परंतु, काही स्थानिक नेत्यांनी तुपकरांना बुलढाण्यातून उमेदवारी देण्याला तीव्र विरोध केला. तसेच, राजीनामे देण्याची व राजकीय संन्यास घेण्याचीही धमकी दिली, त्यामुळे उद्धव ठाकरे हे भावनिक पेचात पडले असल्याचे खात्रीशीर सूत्रांकडून कळते आहे. तुपकर हे महाआघाडीत आले तर त्यांचा महाआघाडीला बुलढाणाच नाही तर सिंदखेडराजा, चिखली, मेहकर या तीन मतदारसंघात मोठा फायदा होणार आहे, हे महाआघाडीच्या नेतृत्वाला माहिती असतानाही, केवळ स्थानिक नेत्यांच्या विरोधामुळे तुपकरांना उमेदवारी जाहीर करण्यास उद्धव ठाकरे हे विलंब लावत असल्याचेही या सूत्राने सांगितले.
दुसरीकडे, बुलढाण्याची जागा काँग्रेसने प्रतिष्ठेची केली असून, त्यासाठी महाराष्ट्र निवडणूक प्रभारी तथा काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खा. मुकूल वासनिक यांच्यासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठाकरे यांच्यावर दबाव वाढविला असल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे हे ज्या त्यांच्या निष्ठावंत उमेदवाराला उमेदवारी देण्याची शक्यता आहे, त्या उमेदवाराला मते मिळणार नाहीत, त्यामुळे शिंदे गटाचे विद्यमान आमदार संजय गायकवाड हे मोठ्या मताधिक्क्याने व आरामशीर निवडून येईल, ही बाबही काँग्रेसच्या नेत्यांनी ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडे अॅड. जयश्रीताई शेळके व हर्षवर्धन सपकाळ हे सक्षम उमेदवार असून, त्यात अॅड. जयश्रीताई शेळके यांच्या बाबतीत विविध सर्वेक्षणांचे रिपोर्ट हे सकारात्मक आलेले आहेत. जयश्रीताईंना शिवसेना (ठाकरे) किंवा काँग्रेसची उमेदवारी मिळाली तर त्या संजय गायकवाड यांचा पराभव करू शकतात. किंवा, रविकांत तुपकर यांना ‘मशाल’ चिन्हावर लढायला भेटले तरी, ते संजय गायकवाड यांचा पराभव करून उद्धव ठाकरे यांचे ‘गद्दाराला पराभूत करण्याचे स्वप्न’ पूर्ण करू शकतात. परंतु, उद्धव ठाकरे यांच्या ठोस निर्णयाअभावी महाआघाडी या मतदारसंघात चांगलीच अडचणीत आलेली दिसते आहे.
दुसरीकडे, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आणखी काही दिवस उद्धव ठाकरे यांच्या निरोपाची वाट पाहण्याचे ठरवलेले दिसत असून, सकारात्मक व सन्मानजनक प्रतिसाद भेटला नाही तरच अपक्षच निवडणुकीला सामोरे जाण्याचे निश्चित केलेले आहे. तुपकर हे किमान १६ ते १८ जागा राज्यांत उभे करू शकतात, तसेच बुलढाणा जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात ते उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे, त्यांची वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशीही सकारात्मक चर्चा झालेली असून, त्यामुळेच अॅड. आंबेडकर यांनी बुलढाण्यातील सिंदखेडराजा वगळता इतर जागांवरील उमेदवार जाहीर करण्याबाबत ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका घेतली असल्याचे कळते आहे. तुपकर अपक्ष लढले काय, किंवा आंबेडकरांसोबत गेले काय? त्याचा सर्वाधिक फटका हा महाआघाडीलाच बसणार असून, घाटावरील सर्व जागांवर महाआघाडीच्या उमेदवारांचा मोठ्या फरकाने पराभव होणे निश्चित मानले जात आहे. त्यामुळेच, उद्धव ठाकरे यांनी भावनिकतेला प्राधान्य न देता, निवडून येण्याची क्षमता हाच निकष लावून तातडीने निर्णय घ्यावेत, यासाठी महाआघाडीचे नेते प्रयत्न करत असल्याचेही वरिष्ठस्तरीय राजकीय सूत्राने सांगितले आहे.
————-