उर्वरित हक्काच्या पीकविम्यासाठी गावोगावी पेटला वणवा!
- शेतकर्यांमध्ये पीकविमा कंपनीच्या विरोधात तीव्र रोष : डॉ.ज्ञानेश्वर टाले
– २०२३ ते २०२४मधील सोयाबीन व हरभर्याचा पीकविमा न भेटल्यामुळे गावागावात सत्ताधार्यांविरोधात शेतकर्यांमध्ये संतापाची लाट – ऋषांक चव्हाण
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – शेतकर्यांना पीकविम्याची हक्काची रक्कम न मिळाल्याने मेहकर व लोणार तालुक्यांतील गावागावांत संतापाची लाट उसळली असून, पीकविमा कंपनीने शेतकर्यांचा हक्काचा पीकविमा तातडीने द्यावा, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा खणखणीत इशारा शेतकरी नेते डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी सत्ताधारी पक्षासह पीकविमा कंपनीला दिला आहे. तर, २०२३ ते २०२४ मधील सोयाबीन व हरभरा पिकांचा पीकविमा अद्यापही मेहकर व लोणार तालुक्यांतील शेतकर्यांना भेटलेला नाही. त्यामुळे सत्ताधार्यांविरोधात गावोगावी शेतकर्यांत संतापाची लाट निर्माण झालेली आहे. आम्ही शेतकर्यांच्या हक्कासाठी टोकाची लढाई लढू, असा इशारा शेतकरी नेते ऋषांक चव्हाण यांनी दिलेला आहे. पीकविमाप्रश्नी आमदार संजय रायमुलकर यांनी डॉ. ज्ञानेश्वर टाले व शेतकरी नेत्यांवर नौटंकीचा आरोप करून अश्लाघ्य टीका केली होती, त्याचाही समाचार डॉ. टाले यांनी घेतला. दरम्यान, गावोगावी आयोजित संवाद बैठकांना जोरदार प्रतिसाद लाभत असून, शेतकरी विद्यमान आमदारांसह सरकारविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करू लागले आहेत.
मेहकर व लोणार तालुक्यातील पीकविमा न मिळालेल्या शेतकर्यांच्या गावागावांत संवाद बैठका घेऊन, पीकविम्याच्या हक्काच्या लढाईसाठी शेतकर्यांनी तयार रहावे. आपला हक्काचा पीकविमा सरकारच्या व कंपनीच्या मानगुटीवर बसून घेऊ, तोपर्यंत ही शेतकर्यांची लढाई थांबणार नाही. मेहकर व लोणार तालुक्यातील शेतकर्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनात शेतकर्यांना मार्गदर्शन व संवाद बैठका गांवागावात डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्या उपस्थितीत होत आहेत. त्यांनी मेहकर तालुक्यातील मौतखेड येथे शेतकर्यांशी संवाद साधला. यावेळी डॉ. टाले यांनी सांगितले की, जोपर्यंत उर्वरित सर्व शेतकर्यांचा पीकविमा मिळणार नाही, तोपर्यंत गावागावांमध्ये पीकविम्यासाठी शेतकर्याचा वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही.
राज्य सरकारने जर पीकविमाचा त्यांचा हिस्सा दिला नाही तर येणार्या काळात शेतकरी सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. पीकविमा हा आमचा हक्क आह व त्यावरील १२ टक्के व्याजसुध्दा शेतकर्यांना मिळायला पाहिजेत. जर शेतकर्याच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न कोणी करत असेल, त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही राजकीय लोकं करत असून, आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना आमचं सांगणं आहे की नौटंकी कोण करते कोण नाही, हे सगळे शेतकर्यांना माहिती आहे. तारीख पे तारीख कोण देत आहे, पीक विमा मागणं जर गुन्हा असेल तर तो गुन्हा आम्ही करणार लवकरच ही पीक विम्याची लढाई एका वेगळ्या स्वरूपात पुढे येणार आहे. यामध्ये गावागावात शेतकर्यांचा उत्स्फुर्त असा प्रतिसाद मिळत आहे. शेतकर्यांना पीकविमा मिळवून दिल्याशिवाय ही लढाई थांबणार नाही, असा शब्द डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी यानिमित्ताने दिला. यावेळी डोणगाव अर्बन बँकेचे अध्यक्ष ऋषांक चव्हाण, देवाभाऊ आखाडे, सलीम शहा, दशरथ बोरे, मोहन नवले आदींसह मोठ्या संख्येने गावातील शेतकरी पदाधिकारी कार्यकर्त्ते उपस्थित होते.