आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या यशस्वीतेसाठी कटिबध्द व्हा!
साखरखेर्डा येथील शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे आवाहन
साखरखेर्डा (अशाेक इंगळे) सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण असेल याचा विचार न करता महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी काम करावे असे आवाहन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी १५ ऑक्टोबर रोजी केले . साखरखेर्डा, दरेगाव, सवडद, शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा पंचायत समिती सर्कलमधील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्याचा मेळावा आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आ. डॉ शशिकांत खेडेकर हे होते . तर प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख बळीराम मापारी , महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ मायाताई म्हस्के, युवासेना जिल्हा प्रमुख ऋषिकेश जाधव, माजी सरपंच चंद्रशेखर शुक्ल, जिवन सिंग राजपूत, गंभिरराव खरात, श्रीनिवास खेडेकर, मधूकर साखरे, तालुका प्रमुख वैभव देशमुख, दामुअण्णा शिंगणे, बाबुराव मोरे, अनिल चित्ते उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, २०१९ ची निवडणूक भाजपा शिवसेना युतीच्या माध्यमातून लढविली थोड्या फरकाने आपण निवडून हारलो. त्यात आपल्याही काही चुका झाल्या आहेत. महाराष्ट्रात भाजपा व शिवसेना युतीला बहूमत असताना आपल्या नेत्याला मुख्यमंत्री पदाची हाव सुटली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षासोबत आघाडी करुन सरकार स्थापण केले. परंतु त्यांनी घरी बसून काम केले. आमदार , खासदार यांची भेट मिळत नव्हती, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली २०२२ मध्ये उठाव केला. आणि जनतेच्या मनातील सरकार स्थापन केले. आज काही नेते आपल्या सोयीनुसार राजकारण करीत आहेत . येत्या निवडणुकीत महायुतीकडून राष्ट्रवादी, भाजपा आणि शिवसेना ही युती अभेद्य असून यापैकी कोणताही उमेदवार असला तरी सर्वांनी एकजुटीने काम करीत विजय मिळवायचा आहे असेही त्यांनी पुढे बोलतांना सांगितले. माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांनी हा मतदारसंघ शिवसेना पक्षाला सुटेल अशी अपेक्षा व्यक्त केली . त्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन केले. जिल्हा प्रमुख बळीराम मापारी, युवासेना जिल्हा प्रमुख ऋषिकेश जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले . प्रास्ताविक उपजिल्हाप्रमुख बाबुराव मोरे यांनी मांडले तर संचालन अविदास बंगाळे यांनी केले . मेळाव्याच्या यशस्वितेसाठी युवासेना तालुका प्रमुख संदीप मगर, शिंदींचे सरपंच अशोक खरात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप बेंडमाळी , अनंता शेळके ,जायभाये यांनी अथक परिश्रम घेतले .