अॅड. नाझेर काझी अजितदादांसोबतच राहणार!
- अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष म्हणतात, कुणी कोठेही गेले तरी, मी अजितदादा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार!
– दोन दिवसांत निर्णय सांगणारे आ. राजेंद्र शिंगणेंनी मात्र पाळले मौन!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – मातृतीर्थ सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणूक संदर्भात अनेक तर्कवितर्क काढले जात आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहणार असल्याची माहिती अॅड. नाझेर काझी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कुणी कुठेही गेले तरी आपण अजितदादांसोबतच राहणार आहोत, अशा शब्दांत त्यांनी आ. राजेंद्र शिंगणे यांच्यासोबत न जाण्याचे संकेत दिले आहेत.
दि. १६ ऑक्टोबररोजी माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा संवाद मेळावा सिंदखेडराजा येथे झाला. या मेळाव्याचे वृत्तसंकलन पत्रकारांनी करू नये, असे आवाहन जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांनी केले होते. त्यानुसार सर्व पत्रकारांना या मेळाव्यातून बाहेर जाण्याचे सांगितले गेले होते. पत्रकारांना मेळाव्यात स्थान का नाही, याबाबत अनेकांच्या मनात पाल चुकचुकली होती. अखेर आज त्याचा उलगडा झाला आहे. आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी शरदचंद्र पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करुन तुतारी हातात घ्यावी, असा एकूण कल दिसून आला. या मेळाव्याला सर्वप्रथम अॅड. नाझेर काझी यांनी संबोधित केले. त्यांनी कोणतीही भूमिका मांडली नाही. केवळ माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे हेच मार्गदर्शन करतील, असे सूचविले. त्यानुसार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात आ. शिंगणे यांनी आपली भूमिका स्पष्ट न करता, आपला जो निर्णय राहील तो मला मान्य राहील. याबाबत आपल्या प्रतिक्रिया मांडण्याची संधी कार्यकर्त्यांना त्यांनी दिली.
दोन दिवसात माझा निर्णय मी सांगतो, असे डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. परंतु, दोन दिवस झाले तरी त्यांचा निर्णय आला नाही. परंतु, नाझेर काझी यांनी आपला निर्णय घेतला आहे. त्यामुळे मतदारांत चर्चेला उधाण आले आहे.
यावर काहींनी साहेब आपण ठरवाल ते धोरण आणि आपण बांधाल ते तोरण, अशी भूमिका मांडली. तर काही म्हणाले, साहेब हाच आमचा पक्ष, तर काही म्हणाले, की साहेब साहेब हेच आमचे नेते, तर बहुसंख्य लोकांनी शरदचंद्र पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून तुतारी हातात घ्यावी, असे मत व्यक्त केले. डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी शरदचंद्र पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करावा, अशी मागणी ९९ टक्के लोकांनी केली. कारण, ग्रामीण भागातील मतदार हा भाजपच्या विरोधात आक्रमक आहे. भाजपसोडून काहीही सांगा, असा सूर उमटला. अॅड. नाझेर काझी यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता, त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली की, मी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे. उद्याही त्याच पक्षांचा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करणार आहे. महायुतीमध्ये भाजपचे तीन आमदार असून, शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार आहेत. मलकापूर मतदारसंघात काँग्रेसचा आमदार असून, ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. परंतु, माजी आमदार चैनसुख संचेती यांचा तो मतदारसंघ असल्याने आम्हाला सुटणार नाही. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी सिंदखेडराजा मतदारसंघ आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहोत, आणि विजयश्री मिळविणार आहोत. आज अजितदादा पवार यांच्याकडे पाच संभाव्य उमेदवारांनी मुलाखत दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून लढणार आहे. जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना माझी एकच विनंती राहणार आहे की, आपण खंबीरपणे महायुतीसोबत राहावे, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात, सिंदखेडराजा मतदार संघात, राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होते की, शिंदे शिवसेना गटाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर आणि भाजपचे संभाव्य उमेदवार डॉ.सुनील कायंदे, विनोद वाघ, जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांन्टे हे उमेदवार राहतात, हे पाहावे लागेल.