अजितदादांकडून डॉ. शिंगणेंच्या समजुतीचे प्रयत्न!
- आ. डॉ. राजेंद्र शिंगणे तुतारी हाती घेण्यावर ठाम? - सूत्र
मुंबई (प्रतिनिधी) – सिंदखेडराजा-देऊळगावराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे अजित पवार यांच्या गटातून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घरवापसी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता पाहाता, अजितदादा पवार यांनी डॉ. शिंगणे यांना फोन करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे. या दोघांत काय बोलणे झाले, याचा तपशील हाती आला नसला तरी, डॉ. शिंगणे हे तुतारी हाती घेण्यावरच ठाम असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अजितदादा पवार यांची साथ सोडून, महाआघाडीत शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जावे, असा दबाव त्यांच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी निर्माण केलेला आहे. कार्यकर्त्यांचा आग्रह पाहाता, डॉ. शिंगणे यांनीदेखील तुतारी हाती घेण्याचे संकेत दिले आहेत. एक-दोन दिवसांत निर्णय घेऊ असे डॉ. शिंगणे यांनी सांगितले होते. परंतु, अद्याप त्यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी आज डॉ. शिंगणे यांना फोन करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती हाती आली आहे. त्यांनी आपल्या सोबत थांबावे, अशी गळ त्यांना घातली गेल्याचेही सांगण्यात आले आहे. या चर्चेचा तपशील हाती आला नसला तरी, डॉ. शिंगणे हे मात्र शरद पवार यांच्यासोबतच जाऊन तुतारी हाती घेण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे त्यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी सांगितले आहे.
————