Head linesLONARMEHAKARVidharbha

आ. संजय रायमुलकर अन् सिद्धार्थ खरांतांची डोकेदुखी वाढणार; डॉ. ऋतुजा चव्हाणांना वंचित आघाडीकडून उमेदवारी?

- आज किंवा उद्यापर्यंत प्रकाश आंबेडकरांकडून नाव जाहीर होण्याची शक्यता

– मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघात परिवर्तनाची लाट जोरात!

मेहकर (तालुका प्रतिनिधी) – शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या कट्टर समर्थक व गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणार्‍या शेतकरी नेत्या डॉ. ऋतुजा ऋषांक चव्हाण या लवकरच वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करणार असून, मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघातून त्या वंचित आघाडीच्या उमेदवारीवर राहणार असल्याचे जवळपास फिक्स झालेले आहे. आज किंवा उद्या त्यांची उमेदवारी जाहीर होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीय सूत्राने दिली आहे. डॉ. ऋतुजा यांनी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व स्वीकारत, वंचित आघाडीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मतदारसंघातील राजकीय समिकरणे बदलणार असून, त्याचा फटका विद्यमान आमदार तथा शिंदे गटाचे नेते डॉ. संजय रायमुलकर आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाचे संभाव्य उमेदवार सिद्धार्थ खरात यांनादेखील बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

डॉ. ऋतुजा चव्हाण व त्यांचे पती ऋषांक चव्हाण हे गेली अनेक वर्षे शेतकरी चळवळीत कार्यरत आहेत. मतदारसंघातील शेतकरी नेते डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्यासह सर्व शेतकरी त्यांच्या पाठीमागे एकवटलेले आहेत. दुसरीकडे, मतदारसंघातून डॉ. चव्हाण दाम्पत्याला जोरदार प्रतिसाद मिळत असून, यंदा कोणत्याही परिस्थितीत मतदारसंघात परिवर्तन घडवायचे, असा निर्धार जनमाणसाने केलेला आहे. त्यामुळे जनरेट्यामुळे डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी आमदारकी लढविण्याचा निर्धार केला आहे. या मतदारसंघात मराठा व दलित समाजाची मते निर्णायक ठरणारी आहेत. मध्यंतरीच्या काळात आमदार रायमुलकर यांची व्हायरल झालेली कथित ऑडिओ क्लीप, तसेच ओरिजनल दलित समाजाला ‘आमदारकी’ची न मिळालेली संधी, यासह इतर मुद्द्यांमुळे दलित समाज कमालीचा नाराज आहे. तसेच, शेतकर्‍यांना न मिळालेला पीकविमा, सोयाबीन व कापूस भावाचा प्रश्न, मेहकरमध्ये एमआयडीसी आणण्यात आ. रायमुलकरांना आलेले अपयश, तसेच विकासाचा निर्माण झालेला मोठा अनुशेष या सर्व बाबींमुळे मराठा, ओबीसींसह इतर समाजही या मतदारसंघात नाराज आहे. दुसरीकडे, ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार सिद्धार्थ खरात हे आयात उमेदवार असल्याची टीका होत आहे. त्यांना शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीचाही फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत मराठा समाजाच्या सून असलेल्या व दलित समाजाच्या कन्या असलेल्या डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्यासारख्या उच्च विद्याविभूषित तरूण नेतृत्वाला या मतदारसंघातून विजयाची संधी मिळणार असल्याचे राजकीय धुरिणांचे मत आहे.
सहकार क्षेत्रात ऋषांक चव्हाण यांची असलेली लोकाभिमुख कामगिरी आणि डॉक्टर म्हणून ऋतुजा चव्हाण यांनी जनतेला मनमिळावूपणे सेवा तर दिलीच आहे; पण शेतकरी चळवळीत झोकून काम करत त्यांनी शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठीही प्रयत्न केले आहेत. त्यामुळे वंचित आघाडीकडून त्यांना उमेदवारी मिळाल्यास, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असलेले अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना मानणारा मोठा समाज त्यांच्या पाठीमागे भरभक्कपणे उभा तर राहणारच आहे; पण शेतकरी-कष्टकरी समाजदेखील आपले आशीर्वाद त्यांना देणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.


मेहकर व लोणार तालुक्यात रोजगाराच्या काहीच संधी नाहीत. त्यामुळे मेहकरच्या तरूणांना उद्योगधंद्यांसाठी पुण्या-मुंबईला जावे लागते. वारंवार आमदारकी भोगणार्‍या या नेत्यांना साधी एक एमआयडीसी पण मेहकरात आणता आली नाही. आमदारकी मिळाली, राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळाला, तेव्हा केवळ खुर्चा उबवण्याचे काम त्यांनी केले. आजपर्यंतच्या आमदारांनी गेल्या ३० वर्षांत मतदारसंघाला पुढे आणण्याऐवजी ५० वर्षे मागे नेण्याचे पाप केले. त्यामुळे सामान्य जनतेचा तळतळाट त्यांना लागला आहे. या मतदारसंघातील दादागिरी, गुंडगिरी, शिवराळ व धमकीच्या भाषा याचा सूड आता सर्वसामान्य मतदारच उगविणार असून, ही मायबाप जनता मला मोठ्या फरकाने विधानसभेत पाठवणार आहे. या निवडणुकीत संधी मिळाल्यास ५० वर्षे मागे गेलेल्या मेहकर विधानसभा मतदारसंघाला पुढे आणण्यासाठी जीवाचे रान करीन, असा शब्द मी मायबाप जनतेला देते.
– डॉ. ऋतुजा चव्हाण, वंचित बहुजन आघाडीच्या संभाव्य उमेदवार
————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!