आ. डॉ. राजेंद्र शिंगणेंची घरवापसी डॉ. सुनील कायंदेंच्या फायद्याची ठरणार!
- सिंदखेडराजा-देऊळगावराजाची जागा भाजप स्वतःकडे घेणार?; डॉ. कायंदे संभाव्य उमेदवार!
– सिंदखेडराजा मतदारसंघात अनेक दशकानंतर शिंगणे-कायंदे लढत रंगण्याची चिन्हे!
सिंदखेडराजा (विशेष प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी महाआघाडीत घरवापसी करण्याचे निश्चित केलेले आहे. ते लवकरच शरद पवार यांच्यासोबत जातील, अशी राजकीय चिन्हे आहेत. तसे, झाले तर महायुतीत सिंदखेडराजा-देऊळगावराजा विधानसभा मतदारसंघाची जागा शिंदे गटाकडे येणे क्रमप्राप्त असले तरी, भारतीय जनता पक्ष ही जागा स्वतःकडे घेणार असल्याची राजकीय वरिष्ठांची माहिती आहे. भाजपचे नेते डॉ. सुनील कायंदे यांच्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे-पालवे या स्वतः पक्षाकडे त्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. तसे झालेच तर या मतदारसंघात अनेक दशकानंतर शिंगणे-कायंदे अशी लढत पहायला मिळणार आहे. डॉ. शिंगणेंविरुद्ध डॉ. कायंदे अशी लढत झाल्यास धक्कादायक निकाल हाती येतील, अशीही राजकीय चर्चा आहे.
सिंदखेडराजा-देऊळगावराजा मतदारसंघातून डॉ. सुनील तोताराम कायंदे यांनी जोरदार तयारी चालवली असून, त्यांना ग्रामीण भागातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. त्यांचे वडिल माजी आमदार तोताराम कायंदे यांचा पराभव करून डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी या मतदारसंघाचा ताबा घेतला होता. १९९५ साली ते अपक्ष म्हणून निवडून आले आणि या मतदारसंघात ‘सब कुछ शिंगणे’ असे समिकरण बनले. २०१४ मध्ये अपवादाने डॉ. शशिकांत खेडेकर हे आमदार बनले व नंतर ते पराभूत झालेत. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, सहकारी संस्था या डॉ. शिंगणे यांच्या ताब्यात असल्याने त्यांचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे जाळे गावोगावी मजबूत आहे. अशा परिस्थितीत त्यांच्याविरोधात महायुती डॉ. शशिकांत खेडेकर यांच्यासारखा उमेदवार देणे शक्य नाही, असेही राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे. डॉ. शिंगणे यांच्याविरोधात मजबूत उमेदवार द्यायचा असेल तर तो डॉ. सुनील कायंदे हेच ठरू शकतात, या दृष्टीने भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस व भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे-पालवे हे नेते महायुतीत ही जागा निश्चितपणे भाजपकडे सोडवून घेतील, अशी एक दाट अटकळ वरिष्ठस्तरीय राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
या मतदारसंघात भाजप मजबूत असून, भाजपचे गावोगावी जाळे निर्माण झालेले आहे. तसेच, याच मतदारसंघात अजित पवार यांना मानणारा एक वर्गही आहे. त्यामुळे डॉ. शिंगणे यांचा पराभव करायचा असेल तर येथून डॉ. सुनील कायंदे यांच्यासारखा दुसरा मजबूत उमेदवार महायुतीकडे तूर्त तरी नाही. सद्या महायुतीकडून उमेदवारीसाठी डॉ. शशिकांत खेडेकर (शिंदे गट), डॉ. गणेश मांटे (भाजप), योगेश जाधव (शिंदे गट), विनोद वाघ (भाजप) अशी भलीमोठी लाईन आहे. यातील भाजप व शिंदे गटाचे नेते बंडखोरी करणे शक्य नाही, ते पक्षादेश पाळणारे नेते आहेत. राज्यातील जागावाटपात भाजपला जास्तीत जास्त जागा हव्या असून, ‘तुम्हाला मुख्यमंत्रीपद देऊन आम्ही त्याग केला होता, आता झुकते माफ देऊन तुम्ही जागावाटपात त्यागाची तयारी ठेवा’, असा निरोप एकनाथ शिंदे यांना भाजपच्या वरिष्ठांनी दिलेलाच आहे. त्यामुळे सिंदखेडराजा मतदारसंघाची जागा ही शिंदे गटाच्या त्यागाचाच एक भाग राहू शकते, असेही राजकीय सूत्रांने स्पष्ट केले आहे. तूर्त तरी डॉ. सुनील कायंदे यांनी गावोगावी आपला प्रचार व गाव भेट दौरे सुरू केले असून, त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांना यापूर्वीच कामाला लागा, असे आदेश दिले असल्याचे त्यांची निकटवर्तीय सांगत आहेत. त्यामुळे शिंगणेविरूद्ध कायंदे ही बहुप्रतीक्षि़त लढत पुन्हा एकदा या मतदारसंघात पहायला मिळण्याची शक्यता आहे.
———-