मलगी ते इसरूळ रस्त्याची वासलात लागली; रस्त्यांवर पडले जीवघेणे खड्डे!
- परिसरातील गावांतून तीव्र संतापाची लाट; विधानसभा निवडणुकीत फटका बसणार?
– लोकप्रतिनिधींना साधा हा रस्ता करता आला नाही; कागदावरच निधी मंजूर?
चिखली (तालुका प्रतिनिधी) – चिखली तालुक्यातील परंतु सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात येणार्या मलगी ते इसरूळ या रस्त्याची पूर्णतः वासलात लागली असून, रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडलेले आहेत. या भागाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांना आमदारकीच्या काळात हा रस्ताही पूर्ण करता आला नाही. या रस्त्यासाठी निधी मंजूर असल्याचे सांगण्यात येत असून, नुसता कागदावर विकास सुरू आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या भागातील गावांना असंख्य अडचणींचा सामना करवा लागत आहे. चारचाकी तर सोडाच, पण साधे दुचाकीनेदेखील जाता येत नाही, त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेचा आ. शिंगणे यांना विधानसभा निवडणुकीत चांगलाच फटका बसण्याची चिन्हे आहेत. तर विरोधक या मुद्द्यावर राजकारणही करण्याची शक्यता आहे.
मलगी ते इसरुळ रस्त्याची देऊळगाव धनगरपासून ते इसरूळपर्यंत अतिशय दुरवस्था झाली असून, रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे, हे समजत नाही. या रस्त्याने वाहन चालविणे अवघड झाले असून, रस्त्यात मोठमोठे खड्डे पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुचाकीचे अपघात घडत आहेत. भविष्यात मोठ्या वाहनाचा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी दयनीय अवस्था या रस्त्याची झालेली आहे, त्यामुळे देऊळगाव धनगरपासून ते इसरूळपर्यंत रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थ करत आहेत.
या मलगी ते इसरूळ रस्त्यासाठी १६ कोटी रूपयांचा निधी मंजूर झालेला आहे. परंतु, विधानसभा निवडणुकीपूर्वी हा रस्ता पूर्ण करून घेण्यात विद्यमान आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांना अपयश आलेले आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांविषयी या भागातील गावांतील ग्रामस्थांत तीव्र संतापाची लाट आहे. किरकोळ डागडुजी करून हा रस्ता दुरूस्त केल्या जातो. परंतु, या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या वाळूतस्करीमुळे या रस्त्याची पुन्हा वासलात लागली जाते. त्यामुळे मलगी फाटा ते इसरूळपर्यंतचा संपूर्ण रस्त्ता पक्का सिमेंटचाच करण्यात यावा, अशी या परिसरातील ग्रामस्थांची मागणी आहे.