Breaking newsBuldanaBULDHANAPolitical NewsPoliticsVidharbha

आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी ‘तुतारी’ फुंकलीच!

- शरद पवार, जयंत पाटील, विजयसिंह मोहिते पाटलांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

– आ. शिंगणेंच्या घरवापसीने कार्यकर्त्यांकडून मतदारसंघात फटाके फोडून जल्लोष!
– सिंदखेडराजा मतदारसंघातून ‘तुतारी’ चिन्हावरच लढणार!

सिंदखेडराजा/मुंबई (अशोक इंगळे) – सिंदखेडराजा-देऊळगावराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अखेर मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत, हाती तुतारी घेतली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यासह प्रमुख नेत्यांची यावेळी उपस्थिती होती. डॉ. शिंगणे हे विधानसभा निवडणूक तुतारी चिन्हावरच लढणार असून, त्यांच्या शरद पवार यांच्यासोबत जाण्याचे अजितदादा पवार यांना मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे, मतदारसंघात प्रचारासाठी गाठीभेटी घेणार्‍या गायत्री शिंगणे यांनाही मोठा धक्का बसला असून, त्यांनी मात्र बंडाचे निशाण फडकावले आहे. कालच, गायत्री यांनी शरद पवार यांची भेट घेऊन डॉ. शिंगणेंच्या पक्षप्रवेशाला तीव्र विरोध केला होता. राजकारण आणि समाजकारणात केवळ पवारसाहेबांमुळे मोठे होण्याची संधी प्राप्त झाल्याचे मत डॉ. शिंगणे यांनी यावेळी व्यक्त केले. या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर साखरखेर्डा, देऊळगाव मही, सिंदखेडराजा यासह मतदारसंघात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.

Imageआ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या घरवापसीनंतर मात्र त्यांची पुतणी तथा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या युवा नेत्या कु. गायत्री शिंगणे यांनी शरद पवार साहेब…! निष्ठावंतांचं काय…? असा सवाल करत, सिंदखेडराजा मतदारसंघातून अपक्ष लढणारच असल्याचा दावा केला आहे. कालच मी शरद पवार साहेबांची वाय बी सेंटर येथे भेट घेतली असता, त्या ठिकाणी डॉक्टर शिंगणे यांचा शरद पवार गटात प्रवेश होणार असल्याचा कुठेही सूतवाच नव्हता. मात्र आज त्यांचा प्रवेश झालेला आहे. हरकत नाही मी सिंदखेडराजा मतदारसंघातून अपक्ष लढणारच असल्याची पहिली प्रतिक्रिया गायत्री शिंगणे यांनी देत, बंडाचे निशाण फडकावले आहे.
तर पक्षप्रवेश सोहळ्यानंतर राजेंद्र शिंगणे म्हणाले, की १९९२-९३ पासून मी आदरणीय पवारसाहेबांबरोबर काम करत आहे. १९९५ मध्येदेखील अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्यावर सातत्याने अनेक वर्ष साहेबांबरोबर काम केले. मधल्या काळात मी वर्षभर अजित पवारांसोबत होतो. पण वेळोवेळी मी सांगितले आहे की, जिल्हा बँकेच्या अनेक अडचणींमुळे मी अजित पवारांसोबत होतो. सरकारकडून मला मदत मिळाली नसती तर बँक वाचवणे मला अवघड झाले असते, म्हणून मी अजित पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. आज खर्‍याअर्थाने महाराष्ट्र वाचवण्याची गरज आहे. राजकीय सामाजिकदृष्ट्या अनेक विषयांच्या दृष्टीने महाराष्ट्राला वाचवण्याची गरज आहे. आदरणीय पवार साहेबच हे काम करू शकतात यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आज मी पक्षात वापस येत आहे, पक्षात प्रवेश करत नाहीये. पक्ष आणि नेतृत्व जे काही सिंदखेडराजा मतदारसंघात जी जबाबदारी देण्यात येईल ती मी स्वीकारेल. मला कोणत्याही प्रकारचे आश्वासन दिले नव्हते मी स्वतःहून पक्षातून बाहेर पडलो होतो. पक्ष संघटना वाढवण्यासाठी जे नेतृत्व काम देईल ते मी करेल, असेही याप्रसंगी डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह पक्षाच्या संसदीय मंडळाचे सदस्यदेखील उपस्थित होते.

ज्या माणसाला वाटत असेल, की तुतारी हाती घेऊन त्यांना फायदा मिळेल, तर त्यांनी ही गोष्ट डोक्यातून काढून टाकयला हवी. शरद पवार साहेबांनी डॉ. राजेंद्र शिंगणे यांना माफ केले असेल, पण इथली जनता तुम्हाला कदापि माफ करणार नाही. सिंदखेडराजाची जनता तुम्हाला येत्या निवडणुकीत साथ नाही देणार. तुम्ही ना पक्षासाठी एकनिष्ठ होते ना कुटुंबियांसाठी, ना जनतेसाठी, असा प्रहार कु. गायत्री शिंगणे यांनी काका राजेंद्र शिंगणे यांच्यावर केला आहे.

साखरखेर्डा बसस्थानकावर जोरदार जल्लोष

आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पक्षप्रवेशाची बातमी सर्वप्रथम ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने राज्याला दिली. ही बातमी येताच, साखरखेर्डा येथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. गेल्या एक महिन्यापासून डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करावा, असा दबाव मतदार संघातून वाढला होता. साहेब तुम्ही शरदचंद्र पवार साहेब यांची साथ सोडायला पाहिजे नव्हती. जे झाले ते विसरून आपण पुन्हा पवार साहेब यांना साथ देऊ, या असा सल्ला अनेकांनी दिला होता. त्यामुळे अनेक दिवसांपासून डॉ. राजेंद्र शिंगणे मतदारसंघात फिरत असताना आणि विकासकामे करीत असताना प्रत्येक ठिकाणी हाच आवाज येत होता. साहेब ‘रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी’ असा नारा दिला जात होता. अखेर १६ ऑक्टोबररोजी माजीमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी सिंदखेडराजा येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. त्या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. ९९ टक्के कार्यकर्त्यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोन दिवसांनी आपण निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते. चार दिवस झाले तरी डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा निर्णय काय? याची प्रतीक्षा कार्यकर्त्यांना लागली होती. आज दुपारी पाच वाजता मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचा अधिकृत प्रवेश करुन हातात तुतारी दिली. त्यांचे दुपट्टा घालून स्वागत केले. यावेळी नेते हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील यांची उपस्थिती होती. ही बातमी साखरखेर्डा येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांना समजताच बसस्थानकावर सरपंच सुनील जगताप, माजी सरपंच कमलाकर गवई, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल तुपकर, माजी सरपंच दाऊद सेठ कुरेशी, ग्रामसेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष ललित अग्रवाल, रामदाससिंह राजपूत, ग्रामपंचायत सदस्य संतोष मंडळकर, इब्राहिम शहा, शुभम राजपूत, संतोष जैस्वाल, संग्रामसिंह राजपूत, युनूस दिवाण नाईकवाडी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तेजराव देशमुख, माजी सभापती सुरेश तुपकर, सरपंच नितीन ठोसरे यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला.


 

पवारांचे भाजपला दणके सुरूच; शिंगणेंनंतर रणजितसिंह मोहिते पाटलांच्या हातीही तुतारी!

विधानसभेच्या तोंडावर शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षाला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले आहे. आज रात्री ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!