Head linesPolitical NewsPoliticsSINDKHEDRAJAVidharbha

आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या ‘घरवापसी’मुळे अनेकांचे मार्ग मोकळे!

- 'महायुती'चा उमेदवार कोण? डॉ. शशिकांत खेडेकर, की डॉ सुनील कायंदे?

– कु. गायत्री शिंगणे अपक्ष लढणार? की अजितदादांच्या गटात जाऊन ‘घड्याळ’ हाती घेणार?
– शरद पवारांच्या भरवश्यावर सख्ख्या काकांशी उभे वैर, हीच कु. गायत्री शिंगणे यांची राजकीय चूक!

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – आमदार तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षप्रवेशामुळे सिंदखेडराजा मतदारसंघ आज दिवसभर राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी होता. या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक उमेदवारांनी आपली फिल्डिंग आता टाईट करण्यास सुरूवात केली आहे. डॉ. शिंगणेंच्या घरवापसीमुळे महायुतीचा उमेदवार कोण? यात खलबते सुरू झाली आहे. त्यात शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर आणि भाजपचे डॉ. सुनील कायंदे हे दोघे आघाडीवर आहेत. त्यात अ‍ॅड. नाझेर काझी यांनी आपला दावाही कायम असल्याचे सांगितल्याने राजकीय वातावरण सद्या चांगलेच गरम आहे. दुसरीकडे, कु. गायत्री शिंगणे यांनीदेखील बंडाचे निशाण फडकावले असून, त्या आता अपक्ष लढणार की, अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीत जाऊन घड्याळ हाती बांधणार हे आता पहावे लागणार आहे.

महायुतीचे भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे तीन घटक पक्ष आहेत. यातील शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत साखरखेर्डा येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपणच संभाव्य उमेदवार असल्याचे सांगितले आहे. तर प्रतापराव जाधव यांचे पुतणे योगेश जाधव यांनीसुध्दा लोकसभा निवडणुकी नंतर मतदारसंघात फिरुन भावी उमेदवार म्हणून प्रचार सुरू केला आहे. भाजपचे ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.सुनील तोताराम कायंदे यांनी पाच वर्षांपासून मोर्चेबांधणी करीत, आता किती दिवस थांबायचे? यावेळी भाजपकडून हा मतदारसंघ सोडविण्यासाठी प्रयत्न चालवला आहे. जोपर्यंत भाजप निवडणूक लढणार नाही तोपर्यंत हा मतदारसंघ भाजपकडे येणार नाही, हे ठरवून त्यांनी पक्ष बांधणी सुरू केली आहे. भाजपाकडून जिल्हा अध्यक्ष डॉ. गणेश मान्टे, विनोद वाघ, अंकुर देशपांडे यांनीसुध्दा उमेदवारी मिळविण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. तर अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी यांनी या मतदारसंघावर हक्क सांगितला असून, लवकरच उमेदवार निश्चित होईल, असे सूतोवाच केले आहे. अ‍ॅड. काझीदेखील येथून लढण्यास इच्छूक आहेत. एकूणच तीनही पक्ष प्रबळ दावेदार असले तरी, या मतदारसंघात डॉ.शशिकांत खेडेकर यांनी चारवेळा निवडणूक लढविलेली आहे. एकवेळा विजयही मिळविला आहे. त्यांची पकड मजबूत असून, त्यांना उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा शिवसेना गोटातून व्यक्त केली जात आहे. परंतु, भाजपच्या वंजारी कार्यकर्त्यांनी ‘नाना यंदा थांबा’, अशा घोषा लावला असून, डॉ. सुनील कायंदे यांच्या पाठीमागे या मतदारसंघातील बहुसंख्य वंजारी समाज एकवटला असल्याचे दिसून येत आहे.
मागील अनेक जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पक्ष फॅक्टर बाजूला ठेवून जात फॅक्टर राबविल्याने सिंदखेडराजा पंचायत समितीमधील पाच जिल्हा परिषद सर्कलपैकी एकाच ठिकाणी भाजपला यश आले होते. बाकी ठिकाणी शिवसेना उमेदवाराला पाठबळ मिळाले नाही. ती नाराजी आजही मतदार संघात आहे. याचा सामना भाजपला करावा लागेल. भूतकाळात केलेल्या चुका भविष्यकाळात या मतदारसंघात उफाळून येतात. साखरखेर्डा जिल्हा परिषद सर्कलमध्ये भाजप उमेदवार यांना डावलून काँग्रेस उमेदवार यांना सहकार्य करणे, शिवसेना उमेदवाराला मतदान न करणे, या मागील काही चुका भाजप नेतृत्वाला डोकेदुखी ठरणार आहे. पक्षाचे आदेश कितपत पाळले जातात, यावर विजयाचे गणित ठरणार आहे. डॉ. शिंगणे यांच्या शरद पवार यांच्यासोबत जाण्याने महाआघाडीला सिंदखेडराजा-देऊळगावराजा मतदारसंघातच नाही तर जिल्हाभरात बळकटी आली आहे. यानिमित्ताने शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते, काँग्रेसचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे डॉ. शिंगणे, माजी आ. रेखाताई खेडेकर यांच्यासह इतर प्रबळ नेत्यांमुळे जिल्ह्यातील सर्वच जागांवर महाआघाडीला फायदा होणार आहे.


कु. गायत्री शिंगणे यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. गायत्री या राजकारणात फारच कच्च्या दिसू लागल्या आहेत. खरे तर पवारांचे राजकारण समजण्याचे त्यांचे वयदेखील नाही. ‘जो शरद पवारांवर विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला’, असे ग्रामीण भागात अतिशय गंमतीने बोलले जाते. शरद पवार पाठीशी आहेत, आपलेच तिकीट पक्के आहे, असे खरे माणून, राजकीय मुरब्बी असलेल्या सख्ख्या काकांशी त्यांनी उभे वैर धरणे, हेच मुळी चुकीचे होते. पवार हे कधी काय निर्णय घेतील, हे सांगता येत नाही. त्यामुळे यापुढे तरी गायत्री शिंगणे यांनी संयम ठेवणे किंवा राजकीय पाऊले सावधपणे उचलणे, हेच हिताचे राहणार आहे.

राजकीय कारकिर्दीची सुरूवात आमदारकीपासून नाही तर जिल्हा परिषदेपासून करणे, हेच त्यांच्यासाठी हिताचे राहील, असे राजकीय वर्तुळातून चर्चिले जात आहे. शरद पवार यांचे राजकारण पुरेसे समजल्यानंतरच त्यांनी आमदारकीच्या आखाड्यात उतरावे, असेही सांगितले जात आहे.

आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी ‘तुतारी’ फुंकलीच!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!