जिल्ह्याला पावसाने पुन्हा झोडपले!
- वादळासह तुफान बरसला; सोयाबीन सुड्या भिजल्या, वीजपुरवठाही खंडित!
– १५ हजार हेक्टरवरील सोयाबीन, कापूस पीक हातचे गेले!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – जिल्ह्याला काल दि.१८ व आज दि. १९ ऑक्टोबररोजी पुन्हा एकदा पावसाने झोडपले. वादळी पाऊस बरसल्याने बरेच शेतकर्यांच्या सोयाबीन सुड्या भिजल्या तर काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. अचानक आलेल्या पावसाने जवळपास १५ हजार हेक्टरवरील कापूस, सोयाबीन, मका व इतर पिकांचे नुकसान केले आहे.
जिल्ह्यात गेल्या आठवड्यात आठवडाभर तुफान पाऊस बरसला. यामुळे जवळजवळ दीड लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची झळ घाटाखाली जास्त बसल्याचे दिसून येत आहे. सदर नुकसानीचे पंचनामे पूर्ण होत नाही, तोच काल, दि. १८ आज दि. १९ ऑक्टोबररोजी जिल्ह्याला पुन्हा पावसाने झोडपून काढले. वादळी वार्यासह तुफान पाऊस बरसल्याने अनेक शेतकर्यांच्या सोयाबीनच्या सुड्या भिजल्या तर कापूसही ओला झाला. याच बरोबर मका, भाजीपाला व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसातील नुकसानीचा कृषी विभागाचा आकडा १५ हजार २३३ हेक्टरचा आहे. वास्तविक हा प्राथमिक अंदाज असून, यामध्ये वाढदेखील होण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये चिखली तालुक्यातील ११ बाधित गावांतील २४२ शेतकर्यांचे ६९ हेक्टर ७० आर, खामगाव तालुक्यातील ५५ बाधित गावांतील १८ हजार २३७ शेतकर्यांचे १४ हजार ३९६ हेक्टर, मेहकर तालुक्यातील ६ बाधित गावांतील ४४५ शेतकर्यांचे २५८ हेक्टर वरील कापूस, सोयाबीन, मका, भाजीपालासह इतर पिकांचे नुकसान झाले आहे.
विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम, उत्तर महाराष्ट्रातील 50 लाख हेक्टरवरील मका, सोयाबीन, कापूस ही पिके अतिवृष्टीमुळे नष्ट झाली आहेत. परतीचा पाऊस शेतीच्या मुळावर उठला आहे. फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. सरकारने संवेदनशीलतेने तातडीची मदत देवून संकटग्रस्त शेतकर्यांचे अश्रू पुसावेत.
आज दि. १९ ऑक्टोबररोजी संध्याकाळी तर खामगाव तालुक्यातील हिंगणा कारेगाव, पिंपरी गवळी, पळशी, लोणी, चितोडा, शिरला नेमाने आंबेटाकळी तसेच मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा, नायगाव देशमुख, पारखेड, पाथर्डीसह जिल्ह्यातील इतरही भागात वादळी वारा व विजांसह जोरदार पाऊस बरसला. तरी वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. देऊळगाव साकरशा येथील खामगाव रोडवरील विद्युत रोहित्रावर वीज पडल्याने सदर रोहीत्र जळाले. त्यामुळे बसथांबा परिसरातील नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागणार आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचारी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करीत होते. यासह चिखली तालुक्यातील बहुतांश गावात पाऊस झाला असून, शेतीपिकांच्या नुकसानीसह वीज पुरवठाही खंडित झाला होता.
——-