– पेठ येथील घाडगे कुटुंबाचा असाही रोजगार
मेरा बु. ता. चिखली (प्रताप मोरे) – स्मशान भूमीमध्ये लहानांपासून तर वयोवृध्दांपर्यंत सर्वांचे अंत्यसंस्कार केले जातात. आणि अंत्यसंस्कार करतेवेळी प्रेतासोबत दागदागिने टाकण्याची प्रथा आहे, तर काही प्रेतावरील दागदागिने अंत्यसंस्कार वेळी जळून जातात. आणि, याकडे कोणीही फिरून पाहत नाही. मात्र प्रेत जळालेल्या राखेतून सापडलेल्या दागदागिन्यावर पेठ येथील घाडगे कुंटुंब परिवाराचा उदरनिर्वाह चालवीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रसिद्ध शाहीर, साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांच्या ‘स्मशानातील सोनं’ या प्रसिद्ध कथेची आठवण जीवित व्हावी, असे जीणे या कुटुंबाच्या नशिबी आलेले आहे.
चिखली तालुक्यातील पेठ येथील रहिवासी असलेले रमेश घाडगे व रामदास घाडगे हे दोघेजण गुंजाळा येथील स्मशान भूमीमधील प्रेत जाळलेल्या राखेची चाळणी करतांना सैनिक अमोल आटोळे यांनी पाहिले असता, हा प्रकार पाहून संशय निर्माण झाला. त्यामुळे लगेच सैनिक यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे प्रतिनिधी प्रताप मोरे यांना फोनवर माहिती सांगितली.त्यामुळे घटनास्थळी जावून दोघांनाही माहिती दिली की, आमचा हा व्यवसाय अनेक वर्षांपासूनचा आहे. स्मशान भूमीमध्ये अनेक प्रेत जाळले जातात, तेव्हा काही लोक प्रेतावर दागिने ठेवतात, तर काही प्रेतावरील दागिने काढली जात नसल्याने राखेत पडतात. अंत्यसंस्कार झाल्यानंतर काही लोक तीन दिवस तर काही लोक पाच दिवस राख उचलून नेत नाहीत. तेव्हा या तीन ते पाच दिवसांमध्ये प्रेत जळालेल्या राखेवर मोकाट कुत्रे बसतात. कुत्रे बसत असल्याने दागिने जमिनीत दबतात. मात्र लोक सावडण्याच्या दिवशी वरच्या वर राख गोळा करून घेवून जातात. त्यानंतर आम्ही त्याठिकाणी जावून राखेची जागा उकरून किंवा खोदून त्यामधून दागदागिने बाहेर काढतो. हा व्यवसाय करण्यासाठी हे दोघेजण सोबत लोखंडी गज व टोपले, चाळणी, या साहित्याचा वापर करतात.
सावडण्याच्या कार्यक्रम आटोपल्यानंतर या स्मशान भूमीकडे कोणीही उलटून पाहत नाही. त्यानंतर आम्ही राखेत दबलेले सोने, चांदी शोधून काढत असतो. गुंजाळा गावात स्मशान भूमीमध्ये राखेची चाळणी केली असता, राखेमध्ये जोडावे, चांदीचे गोल वस्तू मिळून आल्या आहेत. पावसाळ्याच्या दिवसात स्मशान भूमीच्या आजूबाजूला पाणी साचलेले असते. त्या पाण्यात राख चाळणी केली जाते. मात्र उन्हाळ्यात जवळपास पाणी नसल्याने राख पोत्यामध्ये अथवा थैलीमध्ये भरून तलावावर जावे लागते. राखेत सापडलेले दागदागिने विकून कुंटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो, असे रमेश घाडगे व रामदास घाडगे यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.