नांदुरा जिल्हा बुलडाणा:- ( ब्रेकिंग महाराष्ट्र) नांदुरा तालुक्यातील भोटा ते कालवड पर्यंतचा इजिमा ५४ या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे. नागरिकांना या रस्त्यावरुन प्रवास करणे डोकेदुखी ठरत आहे अनेकदा शासन-प्रशासकीय अधिकारी यांना लेखी तोंडी सांगुन निवेदन देऊन देखील अधिकारी आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी कानाडोळा करीत आहेत. कुणीही लक्ष द्यायला तयार नाहीत, दोन वेळा खामगाव आगाराची बस चालू होऊन रस्त्या अभावी बंद पडते. अशा वेळी विद्यार्थी पावसाळ्यात अक्षरशः पाऊस व चिखल चिघळत पायदळ वारी करत भोटा येथून कालवड पर्यंतचा प्रवास पायी करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना रस्त्या अभावी बस मिळत नाही. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे .
देशातील नेते देश महासत्ता होण्याची स्वप्न बघतात परंतु त्याच देशातील विद्यार्थी हे देशाचं भविष्य आहे त्यांना पायी प्रवास जर करावा लागत असेल तर विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायचे की नाही ? हा प्रश्न मलकापूर विधानसभा मतदारसंघातील भोटा, हिंगणा (भोटा) येथील विद्यार्थी व त्यांच्या पालकांना पडत आहे. रस्त्याच्या दुरावस्थेला स्थानिक पातळीवरील नेते व अधिकारी वाळू माफियांना जबाबदार धरत आहेत मात्र त्यांच्यावर हेच अधिकारी व नेते काही कारवाई करत नाहीत उलट त्यांच्याच आशीर्वादाने हे वाळूमाफिया अवैध रितीने वाळू उपसा करित असल्याची चर्चा जनमानसात सुरू आहे. चर्चा वाळूमाफियांची असली तरी संबंधित विभागाकडून मात्र सुमारे २०१५ पासुन कुठलीही डागडुजी या रस्त्याची झालेली नाही मग अशा वेळी संबंधित विभाग विद्यार्थी व नागरिकांना वारेवर सोडणार का ? हा रस्ता असाच दयनीय अवस्थेत राहणार का? येथील नागरिकांना जीव मुठीत धरुनच कायम असाच प्रवास करावा लागणार का? यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रशासन व लोकप्रतिनिधींना कधी जाग येणार हे प्रशासन व लोकप्रतिनिधीच जाणो.. एवढेच मात्र खरे!