Breaking newsHead linesWorld update

रतन टाटा अनंतात विलीन; एका युगाचा अस्त!

- वरळीतील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सर्वधर्मीय प्राथनेनंतर पारशी रितीरिवाजाप्रमाणे शांतता पाठानंतर विद्युतदाहिनीत अग्निदाह
– केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री शिंदेंसह राजकीय, सामाजिक, औद्योगिक क्षेत्रातील दिग्गजांनी घेतले अंत्यदर्शन

मुंबई (प्राची कुलकर्णी) – भारतमातेचे थोर सुपुत्र व देशाचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या पार्थिवावर वरळीतील स्मशानभूमीत पारशी रितीरिवाजानुसार शांतता पाठ झाल्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पार्थिव विद्युत दाहीनीला सोपविल्यानंतर उपस्थितांचे डोळे पाणावले होते. भारतमातेने उत्तुंग व्यक्तिमत्वाचा संवेदनशील सुपुत्र गमाविल्याची भावना यावेळी उमटत होती. याप्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांसहित सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. तत्पूर्वी नरिमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. तेथे नागरिकांनी रांगा लावून पार्थिवाचे दर्शन घेतले. तत्पूर्वी, मुंबई पोलिसांच्या बँड पथकाने टाटांना त्यांच्या कुलाब्याच्या निवासस्थानी मानवंदना दिली. त्यानंतर अंत्यसंस्कारासाठी पार्थिव वरळीमधील स्मशानभूमीत आणण्यात आले. तेथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी रतन टाटा यांचे अंत्यदर्शन घेतले. पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याआधी सर्वधर्मीय प्रार्थना करण्यात आली. प्रत्येक धर्मातील धर्मगुरूंनी त्यांच्या धर्मातील रीतिरिवाजाप्रमाणे प्रार्थना केली. शीख, बौद्ध, हिंदू आणि ख्रिश्चन परंपरेनुसार ही प्रार्थना पार पडली. त्यानंतर शासकीय इतमामात व पारशी रितीरिवाजानुसार शांतता प्रार्थना झाल्यानंतर पार्थिव विद्युतदाहिनीला सुपूर्त करण्यात आले व एका महान युगाचा अस्त झाला.

रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला जावा, अशी मागणी विविध स्तरावरून होत असतानाच, राज्य मंत्रिमंडळात रतन टाटा यांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

LIVE! भारतमातेच्या थोर सुपुत्राला अखेरचा निरोप!

रतन टाटा यांचा जन्म १९३७ साली झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईत झाले. त्यानंतर मॅनेजमेंटचा अभ्यास करण्यासाठी हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये प्रवेश केला. त्यांना अतुलनीय योगदानासाठी सरकारकडून पद्मविभूषण, पद्मभूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. रतन टाटा यांनी १९९० ते २०१२ पर्यंत टाटा ग्रुपच्या चेअरमनची भूमिका निभावली. १९९१ मध्ये रतन टाटा हे टाटा समूहाचे अध्यक्ष झाले आणि शंभर वर्षांपूर्वी त्यांच्या आजोबांनी स्थापन केलेल्या टाटा समुहाचे ते २०१२ पर्यंत अध्यक्ष होते. त्यांनी १९९६ मध्ये दूरसंचार कंपनी टाटा टेलिसर्व्हिसेसची स्थापना केली आणि २००४ मध्ये आयटी क्षेत्रातील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही कंपनी सार्वजनिक केली. २००९ मध्ये, रतन टाटा यांनी मध्यमवर्गीयांसाठी जगातील सर्वात स्वस्त कार उपलब्ध करून देण्याचे वचन पूर्ण केले. १ लाख किंमतीची टाटा नॅनो ही मध्यमर्गीयांसाठीची कार त्यांनी बाजारात आणली होती. रतन टाटा हे टाटा समूहाचे १९९१ ते २०१२ आणि २०१६ ते २०१७ या काळात दोनदा अध्यक्ष होते. त्यांनी कंपनीच्या दैनंदिन कामकाजातून माघार घेतली असली तरी, त्यांनी चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख म्हणून काम चालू ठेवले.

भारतमातेने अनमोल रत्न गमावले; उद्योगपती रतन टाटा यांचे निधन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!