भारतमातेने अनमोल रत्न गमावले; उद्योगपती रतन टाटा यांचे निधन!
- वयाच्या ८६व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रूग्णालयात घेतला अखेरचा श्वास
– देश शोकसागरात बुडाला, राज्य सरकारकडून शासकीय दुखवटा जाहीर
– सायंकाळी वरळी येथील स्मशानभूमीतील प्रार्थनागृहात होणार अंत्यसंस्कार
मुंबई (आरती मेस्त्री) – देशातील आघाडीचे उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री वयाच्या ८६ व्यावर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतमातेने आपले अनमोल रत्न गमावले असून, संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासह उद्योग, राजकारण, समाजसेवा, क्रीडा, सिनेमा यांसह सर्वच क्षेत्रांतून दुःख व्यक्त करण्यात आले. रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देशासह जगभरातूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रतन टाटा यांनी एक व्यक्ती आणि उद्योजक म्हणून जगण्याचे अनेक नवे मापदंड घालून दिले आहेत. त्यांच्या निधनानंतर सामाजिक, राजकीय आणि उद्योग क्षेत्रातून शोकाकूल प्रतिक्रिया उमटत आहेत. मुंबई ही रतन टाटा यांची कर्मभूमी. टाटा घराण्यातील इतर व्यक्तींप्रमाणेच रतन टाटा यांचाही मुंबईशी खास ऋणानुबंध होता.
रतन टाटा यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वीच रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती. परंतु, त्यानंतर रतन टाटा यांच्याकडून प्रसिद्धीपत्रक जारी करत, माझी प्रकृती व्यवस्थित असून, मी रूग्णालयात काही वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, बुधवारी रतन टाटा यांचा प्रकृती खालावत गेली आणि रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटा यांचे पार्थिव कुलाबा येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले, त्यानंतर सर्वसामान्यांना त्यांचे अंत्यदर्शन घेता यावे, यासाठी पार्थिव नरिमन पॉईंट येथील एनसीपीए येथे सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत ठेवण्यात आले आहे. यानंतर वरळी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
रतन टाटा यांच्या निधनाचे वृत्त कळताच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रूग्णालयात जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी बोलताना राज्यातील सर्व मनोरंजन आणि उत्सवाचे कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. तसेच, त्यांच्या पार्थिवावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. तसेच, अंत्यदर्शनसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून मुंबईत येणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोएल टाटा यांची फोनवरून विचारपूस केली. रतन टाटा यांच्या निधनानंतर महाराष्ट्रात एका दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा पाळण्यात येईल. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील. तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे.
दरम्यान, रतन टाटा यांच्या निधनानंतर मिळालेल्या प्रेम आणि सहानुभूतीबद्दल टाटा कुटुंबाने कृतज्ञता व्यक्त केली आहे. ‘आम्ही, त्यांचे भाऊ, बहिणी आणि कुटुंबीय, ज्यांनी त्यांचे कौतुक केले त्यांच्याकडून अपार स्नेहाने सांत्वन स्विकारतो. ते यापुढे आपल्यात नसले तरी त्यांची नम्रता, औदार्य आणि हेतूचा वारसा भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील,’ असे टाटा समूहाने म्हटले आहे.
संवेदनशीलपणा कायम जपणारा, सढळ हाताने मदत करणारा उद्योगपती अशी रतन टाटांची ओळख होती. आयुष्यभर त्यांनी ती जपली. त्यांचा साधेपणा अनेकांसाठी कुतूहलाचा विषय राहिला. टाटा आयुष्यभर साधेपणाने जगले. टाटा समूहाने कोणताही उद्योग सुरू करताना आधी देशाचा विचार केला. देशाच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी अनेक उद्योग सुरु केले. समूहाची ही परंपरा टाटांनी कायम ठेवली. उच्च नैतिक मूल्य जपण्याचे काम त्यांनी केले. संकटाच्या काळात त्यांनी देशाला कायम साथ दिली. कोणत्याही अडचणीत ते ठामपणे, निर्धाराने उभे राहिले. त्यामुळे ते देशाचे लाडके झाले.
टाटा समूहाने दिलेल्या माहितीनुसार, रतन टाटा यांचे पार्थिव आज दक्षिण मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स लॉनमध्ये सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत ठेवण्यात येणार आहे. याठिकाणी लोकांना रतन टाटांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. ‘आम्ही सर्वांना विनंती करतो की त्यांनी गेट ३ वरून एनसीपीए लॉनमध्ये प्रवेश करावा, आणि बाहेर जाण्यासाठी गेट २ चा वापर करावा. एनसीपीएच्या आवारात पार्किंगची जागा उपलब्ध नसणार आहे. दुपारी ४ वाजता, त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी वरळी स्मशानभूमी, डॉ ई मोसेस रोड, वरळी येथील प्रार्थना हॉलमध्ये अंतिम प्रवासाला निघेल,’ असे टाटा समूहाने निवेदनात म्हटले आहे.
रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी झाला. मुंबईच्या कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमधून त्यांनी सुरुवातीचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठातून आर्किटेक्चर आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. १९६२ मध्ये टाटा समूहात येण्यापूर्वी रतन टाटा यांनी काही काळ अमेरिकेत काम केले होते. १९८१ मध्ये त्यांना टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्ष बनवण्यात आले. १९९१ मध्ये जेआरडी टाटा यांच्या निवृत्तीनंतर रतन टाटा यांनी टाटा सन्सचे अध्यक्षपद स्वीकारले.