खामगाव (ब्रेकिंग महाराष्ट्र) माहितीच्या अधिकारात घरभाडे संबंधीची मागितलेली सत्य माहिती सादर न करण्यासाठी आवार जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षिकेला २ हजाराची लाच मागणारा लाचखोर मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात अडकला. ही कारवाई लाचलुचपत विभागाने २५ जुलै रोजी आवार येथे केली. याप्रकरणी लाचखोर मुख्याध्यापकास अटक करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खामगाव तालुक्यातील आवार येथील एका खासगी व्यक्तीने आवार जि.प. मराठी उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या घरभाडे संबंधाने माहिती अधिकारात अर्ज करुन माहिती मागितली. त्यामुळे आवार जि.प. मराठी उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नरहरी विश्वनाथ टिकार वय ५४ रा. अभयनगर घाटपुरी नाका यांनी शाळेतील एका शिक्षिकेला खासगी व्यक्तीने माहिती अधिकरातंर्गत मागितलेली सत्य माहिती न देण्याकरिता २हजाराची लाच मागितली. त्यामुळे शिक्षिकेने नरहरी टिकार यांना लाच न देता याबाबतची तक्रार बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. शिक्षिकेच्या तक्रारीवरुन २२ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी कारवाई केली. पडताळणी कारवाई पूर्ण झाल्यानंतर मुख्याध्यापकाने टिकार यांनी शिक्षिकेला लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २५ जुलै रोजी जिल्हा परिषद उच्च मराठी प्राथमिक शाळा आवार येथे सापळा रचला. यावेळी ठरल्याप्रमाणे तक्रारदार शिक्षिका २ हजाराची लाच घेवून मुख्याध्यापकाच्या कार्यालयात पोहचली व मुख्याध्यापक यांना २ हजाराची लाच घेतांना दबा धरुन बसलेल्या बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी एसीबीच्या फिर्यादीवरुन खामगाव ग्रामीण पोस्टेला मुख्याध्यापकाविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई पोलिस अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परीक्षेत्र विशाल गायकवाड, एएसपी देवीदास घेवारे, एएसपी अरुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडणा लाचलुचपत विभाग पोलिस उपअधिक्षक एस.एन. चौधरी, पोहेकॉ विलास साखरे, नापोकाँ विनोद लोखंडे, मपोकॉ स्वाती वाणी व मापोकाँ नितीन शेख यांनी केली.
नागरिकांना कोणत्याही शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तसेच त्यांच्या वतीने खासगी इसमाने त्यांच्या कोणत्याही शासकीय कामासंबंधी लाचेची मागणी केल्यास तत्काळ संपर्क साधावा,
– एस.एन.चौधरी
पोलिस उपअधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलडणा