Aalandi

आळंदीत अपघातात चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू  

चिमुकलीच्या मृत्युने आळंदीत शोककळा

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील शाळेतून घरी जात असताना दुचाकीला ट्रक डंपरची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात चार वर्षीय मुलीचा दुर्दैवी अंत झाला तर मुलीचे आजोबा जखमी झाल्याची घटना सोमवारी ( दि.२५) सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. गेल्या आठ दिवसांत आळंदीत हा दुसरा रस्ते अपघात असून यापूर्वीचे अपघातात याच भागातील वारकरी विद्यार्थी ठार झाला. यामुळे येथील नागरिक, भाविक, शालेय मुले यांचे रहदारीचा तसेच सुरळीत आणि सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या अपघाताने आळंदी पंचक्रोशीत शोककळा पसरली.

ही घटना चाळीस फुटी रोड जवळील जलाराम गोशाळे जवळ सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात तनिषा थोरवे ( वय ४ वर्ष, रा. थोरवे वस्ती, चऱ्होली खुर्द ) या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या बाबत किसन थोरवे यांनी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डंपर चालक संतोष जामिरूद्दीन माल याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, किसन थोरवे हे त्यांची नात तनिषाला शाळेतून घरी घेऊन जात होते. यावेळी आळंदी-वडगाव रोडवर गोशाळे जवळ ट्रकने त्यांच्या दुचाकीला पाठी मागून येऊन जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. यात मुलीचे आजोबा किसन थोरवे जखमी झाले. त्यांच्यावर आळंदी येथील के. के. रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघात प्रकरणी आळंदी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

या अपघात पूर्वी मागील सोमवारी ( दि. १८ ) सायंकाळी पाचच्या सुमारास भैरवनाथ चौक, वडगाव रोड येथे अमित विठ्ठलराव देशमुख ( वय १९ ) या वारकरी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचा डंपर खाली चिरडून मृत्यू झाला होता. आळंदी शहर परिसरात मोठ्या प्रमाणात खासगी कंपन्या असून परिसरात मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असते. वाहतुकीचा वेग कमी करण्या साठी शहरास जोडणार्या सर्व मार्गावर तसेच इतर मुख्य चौकांत आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची नागरिकांची मागणी जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!