Breaking newsMarathwada

नाथसागराचे १८ दरवाजे उघडले!

पाचोड (विजय चिडे) – नाथसागर अर्थात जायकवाडी धरण ९० टक्के भरल्याने या धरणाचे १८ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले आहेत. सद्या धरणातून ९ हजार ४३२ क्युसेक वेगाने गोदावरी नदीत पाणी सोडले जात आहे. तर नगरसह वरच्या भागातून धरणात ३६ हजार १२९ क्युसेक वेगाने पाणी येत आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनीव चव्हाण यांनी ही माहिती दिली.
जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात आल्याने गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नगर, नाशिकसह वरच्या भागात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जुलै महिन्यातच धरण ९० टक्के भरले आहे. त्यामुळे आज सायंकाळच्या सुमारास जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या उपस्थितीत धरणाचे दरवाजे अर्ध्या फुटाने वर उचलण्यात आले व गोदावरी नदीत पाणी सोडण्यात आले. तसेच, टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार आहे. सद्या जायकवाडी धरणाच्या जलविद्युत केंद्रातून दीड हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होत असून, उजव्या कालव्यातून ५०० व १८ मुख्य दरवाजातून साडेनऊ हजार क्युसेक वेगानी पाणी सोडले जात आहे. यावेळी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, उप अभियंता अशोक चव्हाण,शाखा अभियंता विजय काकडे, गणेश खराडकर, बंडु अंधारे,न.प.चे उपमुख्याधिकारी शेख,पैठणचे नायब तहसिलदार दत्तात्रय निलावड सह पाणी पुरवठाचे व्यंकट पापुलवार याची उपस्थिति होती. धरण प्रशासन व तालुका पशासनाची यंत्रणा सतर्क झाली आहे.

गोदाकाठच्या दोन्ही बाजूच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, विशेषतः पैठण,अंबड, घनसावंगी, परतूर आणि पलीकडील माजलगाव, गेवराई भागातील गोदाकाठच्या गावात राहणाऱ्या सर्व नागरिकांनी सतर्कता बाळगावी.  घाबरून न जाता सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे.  नदीपात्रालगतच्या भागातील शेतामध्ये असणारा शेतीमाल, शेतीऔजारे, मोटारी, विद्युत उपकरणे तसेच पाळीव प्राणी,जनावरे यांना सुरक्षित ठेवावे.  नदीलगतच्या घरामध्ये राहणारे वयोवृध्द, लहान मुलं, महिला या सर्वांना सुरक्षित ठिकाणीच ठेवणे आवश्यक आहे.  कोणाच्याही मालाची अथवा जिवीत हानी होणार नाही, याबाबत उक्त गावांना तात्काळ सावधानतेचा इशारा देणे संबधी संबंधीत यंत्रणेने खबरदारी घ्यावी, असे आवाहन जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!