फडणवीसांच्या काळात पोलिसांना अतिशय अपमानास्पद वागणूक!
– राज्यभरातून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकेची झोड!
मुंबई (विशेष प्रतिनिधी) – कोट्यवधी रूपये खर्च करून मालवणातील राजकोटावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा निकृष्टदर्जाच्या कामामुळे क्षतिग्रस्त झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असताना; तेथे निषेध नोंदविण्यासाठी गेलेल्या शिवसेना नेत्यांमुळे राणे पितापुत्रांपैकी नितेश राणे यांनी पोलिस अधिकार्यांवर धावून जात, त्यांना अरेरावी केल्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असताना; आता शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांची गाडी गणवेशातील पोलिस कर्मचारी धुत असल्याचा व्हिडिओ काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी व्हायरल केल्यानंतर पोलिसांना शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात अक्षरशः अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचे उघडकीस आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांची अवस्था घरगड्यासारखी करून ठेवल्याचे तीव्र आक्षेप सोशल मीडियावर नोंदवले जात असून, या सरकारविरोधातील संतापात आणखीच भर पडली आहे.
सविस्तर असे, की मालवणातील राजकोटावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या काहीच महिन्यात कोसळला. कोट्यवधी रूपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या पुतळ्याची दुर्दशा पाहून राज्यातील प्रत्येक व्यक्ती सद्या प्रचंड संतप्त आहे. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व इतर नेते हे काल मालवणात गेले असता, तेथे राणे पितापुत्रांनी थयथयाट केल्याचे दिसून आले. एवढेच नाही तर नितेश राणे हे एका पोलिस अधिकार्यावर धावून जात असल्याचा व त्यांना अरेरावी करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यात आणखीच संतापाची भर पडली. पोलिसांना मिळत असलेल्या या अपमानास्पद वागणुकीमुळे एकीकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार चिखलफेक होत असतानाच, आज काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्या व्हिडिओत गणवेशातील पोलिस कर्मचारी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची गाडी धुत असल्याचे दिसून येत आहे. हे दोन्हीही व्हिडिओ ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ येथे प्रसारित करत आहे. पोलिसांना अक्षरशः घरगड्यासारखी वागणूक मिळत असल्याचे पाहून राज्य सरकारविरोधात असलेल्या संतापात आणखीच भर पडली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्ताकाळात पोलिसांवर अशी अपमानास्पद वागणूक सहन करण्याची वेळ आल्याने जनमाणसातून फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठल्याचेही विविध सोशल मीडियातील प्रतिक्रियांतून दिसून येत आहे.
महाराष्ट्राचे गृहमंत्री निष्क्रिय झालेत?
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या घटनेवर तीव्र टीका केली आहे. ते म्हणाले की, पोलिसांवर कुत्र्यासारखा धावून जाणारा नपुसंक काल बघितलाच आपण. महाराष्ट्राचे गृहमंत्री येवढे निष्क्रिय की, आत्ता पोलिसांना सत्ताधारी आमदारांची गाडीपण धुऊन द्यायची वेळ आली. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची गाडी धुताना महाराष्ट्र पोलिस., अशा शब्दांत अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावरून टीका केली आहे.
————-
तर, या संदर्भात आ. संजय गायकवाड यांनी न्यूज स्टेट महाराष्ट्र या वृत्तवाहिनीशी बोलताना पुढीलप्रमाणे स्पष्टीकरण दिले आहे..